कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

 साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची घोषणा


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 नवी दिल्ली, : नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत  यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता  साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.

   अकादमीचे सचिव, के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2023 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 24 प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची  निवड व घोषणा करण्यात आली.

  कृष्णात खोत यांच्या लेखनकार्याविषयी

मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात.

कृष्णात खोत हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार कृष्णात खोत’ म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शतकारंभी श्री खोत यांनी त्यांच्या लेखन कार्याला सुरूवात केली आणि मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय 'नांगरल्याविन भुई' हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

रिंगाण या कादंबरी विषयी

रिंगाण या कादंबरीला मराठी भाषा करिता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 साठी आज पुरस्कार जाहीर झाला. प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे. तो धागा पुढे नेत ही कादंबरी माणसांचे जग ओलांडून मुक्या जनावरांच्या भावविश्वात घेऊन जाते. गाव सोडताना वांझ म्हणून मागे सोडून दिलेल्या म्हशींचे काय होते? माणसांच्या सहवासात वाढलेल्या जनावरांवर एकाएकी जंगलात राहण्याची वेळ येते तेव्हा आलेल्या प्रसंगाशी त्या कशा जुळवून घेतात? जनावरांशी नातं तोडून नव्या गावाची वाट धरणाऱ्या देवाप्पाला पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कशी झुंज द्यावी लागते, ती देता देता आतून तुटून तो कसा उद्ध्वस्त होत जातो…. हे  विस्थापितांच्या दु:खांची तीव्रता अवघ्या १६३ पानांच्या या कादंबरीतून वाचकांपर्यत पोहोचवली आहे. केवळ तेवढ्यापुरती ही कादंबरी मर्यादित राहत नाही, तर माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा एक अनोखा अनुबंध या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

श्री अभिराम भडकमकर, डॉ संतोष खेडलेकर आणि श्रीमती अनुराधा पाटील या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता.  साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. 

 साहित्य अकादमी पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 रोजी कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित होण्याची माहिती, सचिव श्री के. श्रीनिवासराव यांनी दिली.


********

Post a Comment

Previous Post Next Post