प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई- . मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. रवींद्र बेर्डे यांनी मराठी सोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला होता. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रवींद्र बेर्डे यांना मागील काही वर्षांपासून घशाचा कर्करोग झाला होता. त्यासाठी त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचारही सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते . मात्र त्यांना उपचारानंतर दोन दिवसांपूर्वीच घरी सोडण्यात आले होते . सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंड असा परिवार आहे.
या चित्रपटांत केले होते काम-
हमाल दे धमाल, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला, भुताची शाळा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका उल्लेखनीय राहिल्या आहेत. १९९५ साली त्यांना व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी ह्रदयविकाराचा झटका आला होता. तर २०११ मध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे निदान झाले. मात्र, कलेवरील प्रेमानं त्यांना संकटावर मात करण्याकरिता जिद्द मिळाली. त्यांनी ३०० हून अधिक मराठी चित्रपट आणि ५ हिंदी चित्रपटात काम केले. नायक द रिअल हिरो, सिंघम आणि हम दो अनजाने या हिंदी चित्रपटातदेखील त्यांनी भूमिका केल्या आहेत.