प्रेस मीडिया लाईव्ह :
कुरुंदवाड : एक हृदय हो भारत जननी ही भारतीय संविधानाची संकल्पना घेऊन खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा संदेश देत आणि तसेच जगणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांचेच नाव घ्यावे लागेल ,असे प्रतिपादन धनंजय धोत्रे यांनी केले.
हेरवाड येथे हेरवाड हायस्कूलमध्ये साने गुरुजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे या होत्या.
साने गुरुजी मातृहृदयी होते. हे जरी खरे असले तरी त्यांना एवढ्याच शब्दात सिमित करून ठेवणे म्हणजे त्यांच्या कार्याला बंदिस्त करून ठेवण्यासारखे वाटते. भूमिगत चळवळ, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करणे, मासिक चालवणे, तळागळातील लोकांच्यासाठी तळमळीने काम करणे, स्वातंत्र्यसंग्रामात बुलेटीन तयार करून वाटणे, ध्येयवादी स्वातंत्र्य सैनिक निर्माण करण्यासाठी केडर बेस निर्माण करणे, जाती धर्मा पलीकडे व शैक्षणिक विकास व्हावा यासाठी अखिल भारतीय राष्ट्र सेवादल संघटना स्थापन करणे यासारखी अनेक कार्ये त्यांनी केली आहेत. या कार्याचा आलेख पाहता त्यांच्यासाठी बहुआयामी हीच उपाधी महत्वाची आहे.प्रारंभी मुख्याध्यापिका माणिक नागावे यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात श्रीमती माणिक नागावे यांनी साने गुरुजींच्या कार्यावर प्रकाश टाकून स्वयंशिस्तीचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन मनीषा डांगे यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.