उपजिल्हा रुग्णालय गारगोटी, नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागात आधुनिकता आणली, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली, नोकर भरतीचे प्रश्न मार्गी लावून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत विकासाचा कायापालट केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी कोल्हापूर येथे केले.
ते गारगोटी तालुका भुदरगड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलत होते. 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटा असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून 15 कोटी रुपयांच्या नविन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीचे लोकार्पण आरोग्य मंत्री, डॉ. तानाजी सावंत यांचे हस्ते व खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड यांचे सह स्थानिक पदाधिकारी तसेच आरोग्य विभागाचे, जिल्हा व तालुका स्तरीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री सावंत म्हणाले, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने जात असून या गतिमान सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक प्रकारचे निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात कामे पूर्णत्वास नेली आहेत. या कामांचे लोकार्पण तसेच सादरीकरण येत्या काळात मोठ्या प्रमाणात करणार आहे. यावेळी त्यांनी माध्यमांना आवाहन केले की शासनाच्या लोककल्याणकारी निर्णयांची व झालेल्या कामांची वस्तुस्थिती लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वास्तव स्वरूपात जनतेसमोर मांडा. राज्यात आरोग्य सेवेचे आधुनिकीकरण करताना प्रत्येक दुर्गम भागात चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळावी. साडेबारा कोटी जनतेचे आरोग्य सुदृढ व वैचारिक दृष्ट्या चांगले हवे यासाठी मोफत उपचार सुरू केले. राज्यातील प्रत्येक शासकीय दवाखान्यात आता तीन ते चार पट ओपीडी वाढल्याचे चित्र सर्वत्र आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यात राज्यभर फिरता दवाखाना सुरू होणार आहे. यामध्ये दोन डॉक्टरांचे पथक, चार बेडची सुविधा व त्या फिरत्या दवाखान्यामध्ये 65 प्रकारच्या रक्ताच्या चाचण्याही केल्या जाणार आहेत. यावेळी त्यांनी आमदार प्रकाश आबीटकर यांनी भुदरगड तालुक्यातील मागणी केलेल्या 14 कलमी कार्यक्रमांमधील विविध विकास कामांचे प्रश्न येत्या दोन महिन्यात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.
भुदरगड तालुक्यामध्ये 114 गावांमध्ये एक लाख साठ हजार लोकसंख्या असून गारगोटी शहराची लोकसंख्या सोळा हजार आहे. त्यासाठी हे उपजिल्हा रुग्णालय आरोग्य विषयक सुविधांसाठी वरदानच ठरणार आहे. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे रुग्णालयाकडील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रसुती, प्रयोगशाळा चाचण्या इत्यादी मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सर्व आरोग्यसेवा तसेच सुविधा मोफत योजनेमुळे रुग्णांचा वाढता प्रतिसाद पाहता ही संख्या दुप्पट होऊन भुदरगडवासियांना त्याचबरोबर आसपासच्या वाडी वस्त्यांमधील लोकांना अतिशय चांगली व दर्जेदार आरोग्यसेवा देता येणे शक्य होणार आहे. नवीन इमारतीत सुरु करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा व रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या इतर आवश्यक सुविधांची पाहणी मंत्री सावंत व इतर मान्यवरांनी केली.
आमदार प्रकाश आबीटकर यांनी यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी मंत्री तानाजी सावंत, चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह शासनाचे आभार मानले. दुर्गम अशा भुदरगड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक चांगली सुविधा निर्माण झाल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक मनुष्यबळ देण्याची मागणीही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली. खासदार संजय मंडलिक यांनी भुदरगड तालुक्यात चांगल्या आरोग्य सुविधा व चांगले रस्ते निर्माण झाल्याचे सांगितले. क्रांतिकारक व शिक्षण तज्ञ म्हणून ओळख असलेल्या भुदरगड तालुक्यात सर्वसामान्यांसाठी शासनाने चांगले प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.दिलीप माने केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदकुमार निर्मळे यांनी केले तर आभार डॉ. सुप्रिया देशमुख यांनी मानले.