आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने शुक्रवारी महानगरपालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने 56 आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरणाचा सोहळा केशवराव भोसले नाटयगृहात प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी बोलताना जीवनातील शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व सांगितले. आपली जडण-घडण शिक्षकांच्या प्रेरणेनेच झाली असून शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो असे प्रतिपादन त्यांनी केले.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या गुणवान शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे हस्ते 'आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. ट्रॉफी, प्रमाणपत्र, फेटा, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच छ. शाहू महाराज यांचे कार्य 100 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केलेचे स्पष्ट करुन त्यांचे द्रष्टेपण अधोरेखित केले. शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी प्रास्ताविक करताना प्राथमिक शिक्षण समितीतर्फे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असलेचे सांगून शासनाकडून मिळणाऱ्या सर्व अनुदानाचा तसेच शैक्षणिक साहित्य, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश इ. चा लाभ विद्यार्थ्यांना नियमितपणे देत असलेचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमा दरम्यान पुरस्कार प्राप्त दोन आदर्श शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी पुरस्काराचे श्रेय कुटूंबास व विद्यार्थ्यांना दिले. आदर्श शिक्षक निवड समितीचे सदस्य प्राचार्य प्रभाकर हेरवाडे व जे.टी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्राथमिक शिक्षण समिती मार्फत नेहमीच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले जातात; शिक्षकांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. विविध सराव परीक्षांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी केले जाते. त्याचा परिणाम म्हणून गेल्या कित्येक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवलेचे दिसून येते. त्यामुळे मनपा शाळांचा पट वाढत असून पालकांचा मनपा शाळांवरील, शिक्षकांवरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे.
कोल्हापूरच्या संस्कृतीस साजेल असा भव्यदिव्य शिक्षक गुणगौरव सोहळा महानगरपालिकेच्या वर्धापन दिनी संपन्न झाला. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन सहा. प्रकल्प अधिकारी रसूल पाटील यांनी केले.
या प्रसंगी सहा.आयुक्त डॉ. विजय पाटील, रसूल पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार समिती नियोजन प्रमुख विजय माळी, शैक्षणिक पर्यवेक्षक, बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी संतोष आयरे, सुधाकर सांवत, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, जगदीश ठोंबरे, सचिन पांडव, पवित्रा जाधव, राजेंद्र आपुगडे, शरद गावडे, आदिती जाधव, विक्रम भोसले, संजय शिंदे, शांताराम सुतार, राजू गेंजगे, सुनिल भांबुरे, पत्रकार, छायाचित्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.