मुद्रांक शुल्क वसुलीसाठी 'अभय योजना'


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : मुद्रांक शुल्क विभागाने थकीत असलेल्या मुद्रांक शुल्क संकलन करण्यासाठी अभय योजना सुरु केली आहे. या अंतर्गत थकीत मुद्रांक शुल्काचे टप्पे करण्यात आले असून त्यानुसार दंडात आणि मुद्रांक शुल्क रकमेमध्ये सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत- जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले आहे.

अभय योजनेसाठी १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० हा कालावधी निश्चित केला आहे. यातील पहिला टप्पा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे. यामध्ये १ लाखापर्यंतच्या मुद्रांक शुल्कामध्ये १०० टक्के सूट देण्यात आली आहे. तर दंडामध्येही १०० टक्के सूट देण्यात आली आहे. एक लाखापेक्षा अधिक मुद्रांक शुल्क वसुलीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. तर दंडामध्ये १०० टक्के सूट आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ हा कालावधी निश्चित केला आहे. या अंतर्गत १ लाख व त्यापेक्षा अधिक रकमेच्या मुद्रांक शुल्कात ४० टक्के सवलत देण्यात आली आहे. तर दंडावर ७० टक्के सूट आहे.

 पहिल्या टप्प्यात १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० हा कालावधी ग्राह्य धरला आहे. यामध्ये १ ते २५ कोटी पर्यंतच्या मुद्रांक शुल्कात २५ टक्के सूट आहे. तसेच यावरील दंडाच्या रक्कम २५ लाखापेक्षा कमी असेल तर त्याला ९० टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच दंडाची रक्कम २५ लाखांपेक्षा जास्त असेल तर २५ लाख दंड म्हणून स्विकारण्यात येवून उर्वरित दंडाच्या रकमेची सुट देण्यात येत आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीं पेक्षा अधिक असेल तर २० टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच 1 कोटी रक्कम दंड म्हणून स्विकारुन उर्वरित दंडाच्या रक्कमेची सुट देण्यात येत आहे.


दुसऱ्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 हा कालावधी ग्राह्य धरण्यात आला आहे. यामध्ये यामध्ये 1 ते 25 कोटी पर्यंतच्या मुद्रांक शुल्कात 20 टक्के सूट आहे. तसेच यावरील दंडाची रक्कम 50 लाखापेक्षा कमी असेल तर त्याला 80 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच दंडाची रक्कम 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर केवळ 50 लाख दंड म्हणून स्विकारण्यात येवून उर्वरित दंडाच्या रकमेची सुट देण्यात येत आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटीं पेक्षा अधिक असेल तर 10 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच 2 कोटी रक्कम दंड म्हणून स्विकारुन उर्वरित दंडाच्या रक्कमेची सुट देण्यात येत आहे.


महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 बाबत अधिक माहितीसाठी मुद्रांक जिल्हाधि कारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड तसेच यांचे अधिनस्त दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. माने यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post