जनता दरबारला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद :
750 हून अधिक नागरिकांची उपस्थिती; 250 हून अधिक अर्ज दाखल
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : जनता दरबारमध्ये नागरिकांकडून सादर होणाऱ्या अर्जांचा जलदगतीने निपटारा करुन नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारमध्ये ते बोलत होते. साधारण 750 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 250 हून अधिक अर्ज दाखल झाले.
यात सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठांनी आपल्या अडचणी पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्याकडे मांडल्या. यावेळी आमदार राजेश पाटील यांनी कुणबी जातीचे दाखले मिळण्याबाबतचा अर्ज सादर केला. यावेळी आमदार पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, इचलकरंजी मनपा उपायुक्त तैमूर मुलाणी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान आणि पी एम किसान योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी येणाऱ्या अडचणी चे निराकरण करा. नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांबाबत त्यांना पुन्हा पुन्हा कार्यालयात जावे लागू नये, यासाठी निकाली न निघणाऱ्या अर्जांबाबत कारण नमूद करुन अर्जदारांना लेखी स्वरुपात अवगत करा, असे त्यांनी सांगितले.
मागील जनता दरबारात 337 अर्ज सादर झाले होते, यातील सर्वांना संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीबाबत लेखी स्वरुपात अवगत केल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
मागील आठवड्यात कागल येथील खानु भागोजी रानगे या मेंढपाळाची बकऱ्याची १५ लहान पिल्ले तरस या प्राण्याने हल्ल्यात मयत झाली होती. श्री रानगे यांना हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते यावेळी देण्यात आली. या घटनेचा पंचनामा झाला असून या मेंढपाळाला शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत देण्याच्या सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
विकसित भारत संकल्प यात्रा अभियानांतर्गत जिल्ह्यात गावोगावी योजनांची माहिती व नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात येतो. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 250 हून अधिक अर्ज जनता दरबारात सादर झाले. सादर झालेल्या अर्जांची साधारणपणे आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये प्रामुख्याने महसूल व तहसीलदार कार्यालय -64, जिल्हा परिषद -27, कोल्हापूर महानगपालिका -22, पोलीस विभाग -19, भुमी अभिलेख विभाग - 9.. आदी प्रमुख विभागांचा समावेश आहे.
यावेळी पालकमंत्री यांनी प्रत्येक अर्जदाराशी चर्चा करुन संबंधित अर्ज निकाली काढण्यासाठी त्या त्या विभागाकडे दिला.