प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत इचलकरंजी शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची अंमलबजावणी सुरु आहे.याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने वस्त्रनगरी इचलकरंजी शहरातील वस्त्र कचरा व्यवस्थापन या विषयाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागरण होणेसाठी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश अत्यंत आवश्यक असलेबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत.
याकामी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या निर्देशानुसार शाळेमार्फत विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी प्राथमिक स्वरूपात सर्व महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या घरातील टेक्स्टाईल कचरा आणि प्लास्टिक कचरा विद्यार्थ्यांच्या मार्फत थेट शाळांमधील संकलन केंद्रामध्ये जमा करून घेणेचा कायमस्वरूपी उपक्रम इचलकरंजी महानगर पालिकेकडून सुरु करणेत आलेला आहे. सदर उपक्रमाचा शुभारंभ महानगरपालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये महानगरपालिका उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत करणेत आला.
याप्रसंगी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी, शहर समन्वयक प्रविण बोंगाळे, स्वच्छता निरीक्षक किरण लाखे, सचिन भुते यांचेसह कर्मचारी आणि शाहू हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.