प्रेस मीडिया लाईव्ह :
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने अर्थात एनसीआरबी ने नुकतीच २०२२ ची आकडेवारी जाहीर केली आहे.त्यामध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचाराबरोबर दंगलीत आणि बाल शोषण गुन्हेगारी (पोक्सो) याबाबतीत ही भारतात एक नंबरवर आहे हे दिसून आले. तर हत्यांमध्ये उत्तर प्रदेश ,बिहार पाठोपाठ महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. २०२२या वर्षांमध्ये महाराष्ट्रात दंगलीचे ८२१८ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे राजकीय, जातीय, धार्मिक मुद्द्यांशी संबंधित आहेत.२०२२या वर्षात महाराष्ट्रात २२९५ हत्यांचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर बाल शोषण गुन्हेगरीची २०७६२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एकेकाळचा गर्जा महाराष्ट्र माझा आज अशा आकडेवारीत अव्वल येणे हे वेदनादायक व शरमेची आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचार, दंगली आणि बाल शोषण यात आघाडीवर असणे हे आपल्या राजकीय व प्रशासकीय यंत्रणेचे मोठे अपयश आहे. त्यामुळे या बाबीकडे सत्ताधारी महायुतीने आणि खास करून गृहखात्याने अधिक बारकाईने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. एकेकाळच्या समृद्ध महाराष्ट्राचे हे अव्वलस्थान बरे नव्हे. हा प्रश्न केवळ टीका,टिपणीशी निगडित नसून तो नीटपणे समजून घेऊन आणि ते मान्य करून बिघडलेली परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष देण्याचा आहे.कारण हा प्रश्न कोणत्याही एका अलाण्या, फलण्या पक्षाचा ,युतीचा अथवा आघाडीचा नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या वास्तवाचा, प्रतिमेचा आणि सुधारणेचा आहे.