पहिल्या तीन आरोपींना देखील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पनवेल न्यायालयात हजर केले असता १९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
खोपोली ढेकू गावाच्या हद्दीत आंचल केमिकल कंपनीत तयार केलेले अंमलीपदार्थ परदेशात पाठवणाऱ्या कस्टम क्लिअरिंग एजंटला अटक करण्यात आली आहे.त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे. आधीचे तीन आरोपीं आणि आत्ताचे चारसह न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देवराज मल्लिकार्जुन गडकर, वय-३४ वर्ष, रा.मुलुंड, (कस्टम क्लिअरिंग एजंट) असे या चौथ्या आरोपीचे नाव आहे. खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकू गावचे हद्दीत मात्र आंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करण्याऱ्या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमलीपदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याच्या माहितीवरून खोपोली पोलिसांनी छापा मारून केलेल्या कारवाईनुसार गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(c), २२ (c) सह कलम २९ प्रमाणे दि. 08/12/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर कारवाईमध्ये पोलीसांकडून सुमारे ३२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा एम. डी. मेफेड्रॉन (Mephedrone) या अंमली पदार्थाचा साठा व त्यासाठी लागणारा कच्चा माल असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.सदर प्रकरणी दाखल गुन्ह्यात दि. ०८ डिसेंबर रोजी एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्यातील आरोपी कमल जयरामदास जैसवानी वय- ४८ वर्ष रा. थारवानी सॉलिटियर ०७२, के विंग, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण वेस्ट २) मतीन बाबू शेख, वय-४५ वर्ष, रा. प्लॉट नंबर १९, अब्रार कॉलनी छत्रपती संभाजीनगर, (३) अॅन्थोनी पाऊलोस करीकुट्टीकरण वय-५४ वर्ष रा.१०३ विश्राम टावर वागळे, स्टेट ठाणे श्रीनगर, जि.ठाणे या तीनही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, खालापुर यांनी दिनांक १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.आरोपींनी आत्तापर्यंत काही अंमलीपदार्थ हे परदेशामध्ये पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यामध्ये कस्टम क्लिअरिंग एजंट म्हणून काम करणारा आणखी एक आरोपी देवराज मल्लिकार्जुन गडकर याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यामुळे सदर आरोपीस १२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्याला तसेच यांनी पहिल्या तीन आरोपींना देखील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पनवेल न्यायालयात हजर केले असता १९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक, रायगड सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सह मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी खालापुर विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत हे पुढील तपास करीत आहेत.