अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी :  भरत शिंदे

अतिग्रे - तालुका हातकणंगले येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा सलग पाच दिवस चाललेला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना संस्थापक श्री संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना संस्कार करण्याची जबाबदारी पालक व शिक्षक यांची असल्याचे सांगितले.

 देशाची सुसंस्कृत पिढी ही चांगल्या शाळांमधून घडत असते. म्हणूनच दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था आपण येथे करत असल्याचे त्यांनी सांगितले. संजय घोडावत शिक्षण संकुल आपल्याला प्राणापेक्षा प्रिय आहे त्यामुळे ते कोणाच्याही हातात दिले जाणार नाही, पालकांनी आपल्यावर ठेवलेला  विश्वास सार्थ करेन अशी ग्वाही दिली व शिक्षण संकुल चालवण्यास देण्यासंदर्भात पसरलेल्या अफवांना पूर्णविराम दिला. मार्कांसोबत विद्यार्थ्यांनी संस्काराचेही धडे घेणे गरजेचे आहे. शाळेतल्या मार्कांपेक्षा विद्यार्थी दशेत घेतलेले संस्कारच चिरंतन टिकतात असेही यावेळी त्यांनी  सांगितले. 

        पहिल्या दिवशी केजी विभागाचे स्नेहसंमेलन 'बाल गणेश' या थीमवर आधारित सादर झाले. केजी मधील चिमुकल्यानी गणेशाची विविध गाणी मोठ्या उत्साहात नृत्यसह सादर केली.

       दुसऱ्या दिवशीच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  दक्षिण आशिया आय बी स्कुलचे अध्यक्ष श्री कैसर दोपेशी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाचे महत्त्व, जागतिकीकरणामध्ये शिक्षणाचा बदललेला चेहरा, जगामध्ये उपलब्ध असलेल्या शिक्षण क्षेत्रातील विविध संधी यांची ओळख करून दिली. या दिवशी केंब्रिज व आयबीडीपीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे 'मोहक जंगल' या थीमवर आधारित विविध नृत्यांचे, गाण्यांचे आयोजन केले होते. 

           तिसऱ्या दिवशी सीबीएससी प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेसिडेन्सी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन, बेंगलोरचे डायरेक्टर श्री अँजेलो मायकेल डिक्रोजा हे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या कामातून  मुलांसाठी वेगळा वेळ काढणे खूप गरजेचे आहे, आज तुम्ही मुलांना वेळ दिला तर उद्या ते तुम्हाला वेळ देतील. प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन 'द फॅन्टसी कार्निवल क्रूज' या थीमवर आधारित विविध गाणी व नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.

        चौथ्या दिवशी सीबीएससी माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे 'ऑस्कर' या थीमवर  आयोजन केले होते. या थीमवर विद्यार्थ्यांकडून विविध नृत्ये व नाटिका सादर करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हैद्राबाद येथील प्रसिध्द प्रेरणादायी व्याख्याते, शिक्षणतज्ञ श्री वासुदेव दर्पण उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, पालकांनी मुलांपुढे मोठे आदर्श ठेवले पाहिजेत. मुलांवर आपली स्वप्ने लादू नका, पैश्यांपेक्षा मुले हीच खरी संपत्ती असल्याचे सांगितले. 

           पाचव्या दिवशी सीबीएससी बोर्डिंग विभागाचे सकाळच्या सत्रामध्ये पारितोषिक वितरण सेठ आनंदराव ग्रुप ऑफ स्कूल नवी दिल्लीच्या डायरेक्टर डॉ नीता बाली व दुपारच्या सत्रामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्पाल संघवी ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या सौ राखी मुखर्जी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 'कृष्णउत्सव ' या थीमवर आधारित विविध गाणी व नाटिका विद्यार्थ्यांकडून  सादर करण्यात आल्या. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नीता बाली म्हणाल्या जगाबरोबर विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व पालकाने बदलणे खूप गरजेचे आहे व राखी मुखर्जी म्हणाल्या 21 व्या शतकातील कौशल्य आत्मसात केली तरच आपला टिकाव लागू शकतो या प्रत्येक कार्यक्रमादिवशी त्या त्या विभागाच्या 'वार्षिक नियतकालिकांचे' प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. त्याचबरोबर विविध विभागातील आदर्श विद्यार्थी -विद्यार्थिनी व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू व विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सर्वच कार्यक्रमास संस्थापक श्री संजय घोडावत, सचिव श्री श्रेणीक घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विराट गिरी, प्राचार्य डॉ एच एम नवीन, उपप्राचार्य श्री अस्कर अली, उपप्राचार्या अर्चना पाटील, मुख्याध्यापिका लॉरेन डिमेलो व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच पालकांनी या सुंदर सोहळ्याचे व उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post