प्रबोधनकार ठाकरे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनी प्रबोधिनीच्या चर्चासत्रातील मत
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेमध्ये एक कालखंड प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या नावाने ओळखला जातो. एवढी मोठी कामगिरी प्रबोधनाच्या क्षेत्रात प्रबोधनकार ठाकरे यांनी केली आहे.आपल्या धारदार लेखणीने आणि तडफदार वाणीने त्यांनी धर्म, संस्कृती, रूढी, परंपरा, श्रद्धा आदींची बुद्धीप्रामाण्याच्या आधारे चर्चा केली. ग्रंथ प्रामाण्या न मानता सत्यशोधनाचा व ते कथन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भोंदूगिरीच्या वस्त्रहरणाची त्यांची मोहीम आज पुन्हा एकदा नव्या तडफेने राबवण्याची गरज आहे.तरच त्यांचा विचारांचा वसा आणि वारसा जपला जाईल असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. '
'प्रबोधनकार ठाकरे यांची विचारधारा 'हा चर्चासत्राचा विषय होता. प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी विषयाची मांडणी केली. त्यातून प्रबोधनकारांच्या एकूण विचार विश्वाचा व्यापक आढावा घेतला.त्यावर झालेल्या चर्चेत तुकाराम अपराध, दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे, शकील मुल्ला ,मनोहर जोशी, शहाजी धस्ते, नारायण लोटके,अशोक मगदूम आदींनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रात असे मत व्यक्त झाले की, महात्मा फुले, लोकहितवादी, आगरकर या विचार परंपरेचे प्रबोधनकार ठाकरे पाईक होते. लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या कृति कार्यात ते सक्रिय सहभागी होते.प्रबोधनकार ठाकरे तर्कशुद्ध साधार आणि साक्षेपी पद्धतीची निर्भीड मांडणी करत असत.त्यांचे लेखन मार्मिक व अर्थपूर्ण असे. मानवी मनावर चुकीच्या रूढी, परंपरा अंधश्रद्धा , अविचार यांची चढलेली पुटं खरवडून काढण्याचं काम प्रबोधनकार ठाकरे यांनी केले.प्रबोधनकार ठाकरे यांनी वर्णाश्रम व्यवस्था, जातीव्यवस्था, स्त्री पुरुष समानता, धर्म,धर्मद्वेश, अंधश्रद्धा,शिक्षण ,सामाजिक न्याय व नैतिकता, श्रमाचे महत्व आणि प्रतिष्ठा,शेती आणि शेतकरी , व्यक्तीपूजा की विचार पूजा, लोकभाषा, लोकराज्य,लोकशाही, ज्योतिषाचा भोंदूगिरी,अनेक विषयांवर मूलभूत स्वरूपाचे टोकदार लेखन केले.सामाजिक, राजकीय,धार्मिक ,सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्र लेखन वाचण्याची आणि त्यापासून प्रेरणा घेण्याची आज नितांत गरज आहे. सामाजिक क्रांती शिवाय राजकीय क्रांती फोल आहे. तसेच सामाजिक लोकशाही खेरीज राजकीय लोकशाही परिपूर्ण होणार नाही ही त्यांची धरणा होती. आजच्या सामाजिक दुहीच्या वातावरणात सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार फार महत्त्वाचे आहेत.
Tags
इचलकरंजी