प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. गोवर्धन पूजेला अन्नकूट असेही म्हटले जाते.
या दिवशी गोवर्धन पर्वत, भगवान श्रीकृष्ण आणि गायींची पूजा केली जाते. तसेच घराच्या अंगणात शेणाने गोवर्धन पर्वताचा आकार तयार केला जातो. गोवर्धन पूजेला भगवान श्रीकृष्णाला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात. दरम्यान, गोवर्धन पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात.
यावर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी सोमवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी २.५६ पासून सुरू होत आहे. तर, मंगळवारी (१४ नोव्हेंबर) दुपारी २.३६ मि. संपेल. परंतु, संपूर्ण देशभरात १४ नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा साजरी केली जाईल. कारण, गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त मंगळवारी सकाळी ६.४३ वाजता सुरु होईल आणि सकाळी ८.५२ मि. संपणार आहे. गोवर्धन पूजेचा शोभन योग मंगळवारी सकाळी सुरु होईल आणि दुपारी ०१.५७ मि. पर्यंत असेल. शोभन योग हा शुभ योग असतो. त्यानंतर अतिगंड योगास सुरुवात होईल, जो अशुभ मानला जातो.
गोवर्धन पूजेची पद्धत
गोवर्धन पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
त्यानंतर शेणाने गोवर्धन पर्वताचा आकार बनवावा. याशिवाय, मातीचे गाय किंवा वासरु तयार करावे.यानंतर पूजेला सुरुवात करावी.
सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाला दुधाने आंघोळ घालावी. यानंतर श्रीकृष्णाची पूजा करु अन्नकूट अर्पण करा.
गोवर्धन पूजेचे महत्त्व
पौराणिक मान्यतेनुसार, गोवर्धन पूजा सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाने सुरू केली होती. श्रीकृष्णाने आपल्या बोटावर गोवर्धन पर्वत उचलून ब्रज लोकांचे आणि पशू-पक्ष्यांचे भगवान इंद्राच्या कोपापासून रक्षण केले होते. यामुळेच गोवर्धन पूजेमध्ये गिरीराजांसह भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. या दिवशी अन्नकूटाचे विशेष महत्त्व मानले जाते.
(डिस्क्लेमर- वरील लेखात दिलेली माहिती मान्यतांच्या आधारे देण्यात आलेली आहे. ती पूर्णपणे सत्य आणि योग्य असेलच असे आमचे म्हणणे नाही. त्यामुळे अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)