प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : बऱ्याचदा प्रेक्षकांना पडद्यावर दिसणारे आम्ही कलाकार सगळ्यांना कळतात. पण बॅक स्टेज काय घडतं, behind the Sean काय चालतं? हे कधीच कोणाला माहीत नसतं. बॅकस्टेज जी लोक काम करतात, ती नसती तर आम्ही कलाकारांनी पडद्यावर किती काम केलं, तरी त्याला काही अर्थ नाही. बॅक स्टेज आर्टिस्टमुळेच आम्ही कलाकार किंवा आपली फिल्म इंडस्ट्री सक्षमपणे उभी आहे. आम्ही जे दिसतो ते त्यांच्यामुळेच दिसतो, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी व्यक्त केले.
कला क्षेत्रातील घटकांसाठी कार्यरत असणाऱ्या 'ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन', महाराष्ट्र या संस्थेच्या तृतीय वर्धापन दिन आज (दि.7) साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कला क्षेत्रात विविध विभागात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी जयकर बोलत होत्या.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कलादर्पणच्या अर्चना नेरवेकर, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा सहाय, सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य ॲड अनुराधा शिंदे, कला दर्पण संस्थेच्या कार्याध्यक्षा तृप्ती अक्कलवार, कनि संस्थेच्या कल्याणी कदम, विजयकुमार उलपे,'ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन', महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष योगेश सुपेकर आणि पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
यामध्ये संगीत क्षेत्रात योगदान देणारे ज्येष्ठ तबला वादक पं. राजू जावळकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. तर सिने क्षेत्रातील योगदाना बद्दल अभिनेत्री स्मिता जयकर यांना 'कृतज्ञता पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. तसेच कोरिओग्राफर फुलवा खामकर यांना नृत्य क्षेत्रातील योगदानं बद्दल पुरस्कृत करण्यात आले. याशिवाय मालिका - नाट्य - अभिनय क्षेत्राकरिता अभिनेत्री रेखा सहाय, प्राजक्ता हणमघर, अभिनेता राजू बावडेकर, दिग्दर्शक-राजन कोलन, लावणी क्षेत्रासाठी छाया खुटेगावकर, लोककला-हेमंत मोरे, वाद्यवृंद- विजय भोंडे, गायिका मंजु मूर्ती, तमाशा क्षेत्रासाठी वसंतराव नांदगावकर, संगीतबारी- मोनिका देशमुख, मिमिक्री आर्टिस्ट-दिव्येश शिरवंडकर, लाईन प्रोड्यूसर-सुजीत मुकाटे, ज्यु. आर्टिस्ट कॉर्डी.-सुदाम काशिद, ध्वनी व्यवस्था- शंकर आरडे, प्रकाश योजना- नंदू शिंदे, पडद्यामागील योगदान राजेश भागवत, वेशभूषा- सुनील चोपडे, सॉन्ग अँड ड्रामा विभागासाठी माया विचारे यादींना सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलताना स्मिता जयकर म्हणाल्या, फिल्म इंडस्ट्री ही केवळ कलाकारांमुळे नाही तर सर्व बॅक स्टेज आर्टिस्टमुळे उभी आहे. त्यामुळे आपण नुसते चित्रपट, नाटक किंवा बॅक स्टेज आर्टिस्ट यांच्या पुरताच मर्यादित न राहता माणसाने शक्य होईल त्यावेळी कुणाच्या ना कुणाच्या मदतीसाठी उभे राहिले पाहिजे. ती आपली प्रवृत्तीच असायला हवी. बहुतांश वेळा तसं होताना दिसत नाही. पण आज पासून हे करायला सुरूवात करा. अशी संधी मिळाल्यास माणसाने ती कधीही गमावू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, ज्येष्ठ तबला वादक पं. राजू जावळकर यांनी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने तबल्यावर अधिराज्य गाजवले आहे. अशा कलाकाराला 'जीवनगौरव पुरस्कार' मिळतो याचा आनंद आहे. कारण कलाकार हयात असतानाच त्याला 'जीवनगौरव पुरस्कार' मिळाला पाहिजे तो संपल्यानंतर नाही. त्याने आयुष्यभर केलेल्या कामाची ती पोचपावती असते. तो कलाकार असतानाच त्या कौतुक सोहळ्याला अर्थ आहे.
यावेळी 'कोण होणार पुण्याचा सिंगीग स्टार' या सोहळ्याचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन अभय गोखले, धनश्री कुलकर्णी यांनी केले.तर ऋतुजा मराठे यांनी आभार मानले.