मानवतावादी संत गुरु नानक



प्रेस मीडिया लाईव्ह : 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com

सोमवार ता. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरुनानक यांची ५५४ वी जयंती आहे.गुरुनानक  हे शीख धर्माचे मूळ संस्थापक आणि प्रवर्तक होते. गुरुनानक यांनी केवळ मानवतेवर आधारित एक नवा पंथ तयार केला. त्यातून शीख धर्म तयार झाला. जैन धर्मात ज्या पद्धतीने चोवीस तीर्थंकरांची अखंड परंपरा आहे. तशी शीख धर्मालाही दहा धर्मगुरूंची परंपरा लाभलेली आहे. गुरुनानक देव ( सन १४६९ ते १५३९)गुरु अंगददेव (१५३९ ते १५५२)गुरु अमरदास (१५५२ ते १५७४)गुरु रामदास (१५७४ ते १५८१)गुरु अर्जुन देव(१५८१ ते १६०६) गुरु हरगोविंद(१६०६ ते १६४५) गुरु हरिराय (१६४५ ते १६६१)गुरु हरि किशन (१६६१ ते १६६४)गुरु तेगबहादुर(१६६४ ते १६७५) आणि गुरु गोविंदसिंग (१६७५ ते १७०८ )अशी ही परंपरा आहे. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात गुरुनानक यांनी सर्वांगीण विषमता नाकारणारी जी मानवतावादी भूमिका रुजवण्याचा प्रयत्न केला तो आज पाच साडेपाच वर्षानंतर ही महत्त्वाचा आहे.


 गुरु नानकांचा जन्म लाहोरच्या नैऋत्येला तळवंडी नावाच्या गावी कार्तिक पौर्णिमेला झाला. क्षत्रिय कुळातील खत्री जातीत जन्मलेल्या नानकांच्या  पित्याचे नाव काळूचंद मेहेता असे होते. तर आईचे नाव तृप्ता होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी शिकायला सुरुवात केली. ते प्रथम संस्कृत आणि फारशी भाषा शिकले. बालपणापासूनच त्यांच्यातील प्रगल्भता वारंवार दिसून येत होती.मोठे झाल्यावर त्यांनी नोकरी व व्यावसाय केला. पण त्यांचे मन त्यात रमले नाही. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचा मूळचंद खत्री यांच्या ' सुलखनी 'नावाच्या मुलीशी विवाह झाला. त्यांना श्रीचंद व लक्ष्मीचंद ही दोन आपत्ये झाली. समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या नानकांना समाजातील दुःख ,दैन्य, दुबळेपणा अस्वस्थ करत असे. त्यातून त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करण्याचा निश्चय केला.


नानकांनी भारताच्या सर्व भागात प्रवास केला. भिन्न भिन्न उपासना पद्धतींचा अभ्यास केला. पंडित, संतांशी चर्चा ,वादविवाद केले. तिबेट, श्रीलंका, ब्रह्मदेश या देशात जाऊन बौद्ध धर्मीयांचे तत्त्वज्ञान आणि जीवन पद्धती समजून घेतली. तसेच अरबस्तान व इराक येथे जाऊन मुल्ला मौलविंशी चर्चा केली. ऍबिसिनीयात जाऊन हबशी लोकांच्यात ते राहिले. त्या काळामध्ये भारताच्या सर्व भागात व भारताबाहेरील अनेक देशात विविध भाषांचे आणि संस्कृतीचे निरीक्षण करून खरा धर्म आणि अध्यात्म काय आहे याचा अभ्यास करणारे आणि त्यानंतर स्वतःचे स्वतंत्र मत बनवणारे गुरुनानक हे पहिलेच भारतीय संत होते. नानक देवांनी सतत बारा वर्षे फिरस्ती केली .तसेच नंतरची बारा वर्षे अध्ययन केले. अखेरीस नानक कर्तारपुर या गावी आले. त्यांचे निवासस्थान हा एक आश्रम होता.तेथे ते सहकुटुंब रहात.त्यांच्या भक्त मंडळीत हिंदू, मुसलमान ,गरीब, श्रीमंत असे सर्व लोक असत. सर्व लोक एकाच पंक्तीत बसून भोजन (लंगर) घेत. या आश्रमात रात्री प्रवचन व हरिकीर्तन होत असे .नानक  स्वतः उत्तम कवी असल्याने त्यांच्या गीतात उपमा आणि उत्प्रेक्षांची रेलचेल दिसून येते.मर्दाना हा मुस्लिम धर्मीय त्यांचा प्रियभक्त त्यांच्याबरोबर सतत असे.


नानक जात,पात ,धर्म,पंथ भेद मानत नसत. कबीरांच्या निर्गुण उपासनेचा खोल परिणाम त्यांच्या विचारांवर झालेला होता. अठरा वर्षे पंजाबात राहिलेल्या महाराष्ट्राच्या संत नामदेव यांच्याही विचारांचा परिणाम त्यांच्यावर होता. नामदेवाचे अभंग गुरुग्रंथसाहेब मध्ये ' नामदेववाणी 'नावाच्या स्वतंत्र प्रकरणात समाविष्ट आहेत. गुरु ग्रंथसाहेबजी या ग्रंथामध्ये भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या जातींच्या आणि धर्मांच्या अनेक प्रसिद्ध संतांच्या रचानांचाही समावेश आहे. अध्यात्म हे विश्वव्यापी असल्याने त्याला कृत्रिम मर्यादा घालणे इस्ट नाही अशी विशाल आणि सर्वसमावेशक वृत्ती गुरु नानकांच्याकडे होती. हा ग्रंथ मुख्यतः प्रार्थना पर आहे. त्यामध्ये वाणीविवेक, मनविवेक, एकता, दया, शांती, क्षमा ,आनंद ,क्रोधत्याग ,स्वउन्नती , इष्टाचरण आदी मूल्ये समाविष्ट आहेत. या ग्रंथाची भाषा कठीण आणि दुर्बोध नसून लोकांची बोलीभाषा असल्याने तो सर्वांना सहजपणे समजतो. त्याला गुरुवाणी असे म्हटले जाते.गुरुवाणीच्या नित्य कीर्तन प्रसंगाला गुरुसंगत असे म्हणतात. आणि भेदभाव विरहित सर्वांच्या सहभोजनाला गुरुपंगत असे म्हणतात.


महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने संत ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंतच्या संतपरंपरेने आहे  विचारांचा जागर केला तसाच विचारांचा जागर भारताच्या सर्व भागांमध्ये झाला. भारतात भक्ती मार्गाची चळवळ सुरू झाली आणि तिने उत्तर भारतामध्ये चांगली कामगिरी केली. रामानंद ,कबीर, चैतन्य व गुरुनानक यांनी त्यासाठी मोठे योगदान दिले. कर्मकांडे ,श्राद्धपक्ष, ब्राह्मण भोजने, सहस्त्रावर्तने आरत्या ,उपास तपास या गोष्टी धर्माचे सार नसून देव भावाचा भुकेला आहे .त्याला फक्त मानवाचे शुद्ध आणि निस्वार्थ प्रेम हवे असते. तेव्हा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. त्यामुळे मानवता आज खरा धर्म आहे ही भूमिका या संतांनी मांडली. हा मार्ग लोकांना बिनत्रासाचा, बिन खर्चाचा आणि आपला वाटला. भक्तीमार्ग  गरीब ,अशिक्षित ,दलित, पतीत माणसाला अंतरिक दिलासा देणारा आणि बळ देणारा वाटला त्यामुळे बहुजन समाजाने तो स्वीकारला. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय व्यापक करण्याचा प्रयत्न केला .या मार्गाला उत्तरेमध्ये तुलसीदास, सूरदास ,कबीर ,मीराबाई, चैतन्य महाप्रभू ,दादू अशा अनेक क्षमताने रुजवण्याचा प्रयत्न केला. संप्रदायाला स्वतःचे असे एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न हा गुरू नानकानी केला.


गुरुनानक हे सर्वधर्मसमभावाचे पहिले उद्गाते मानावे लागतील.  मुसलमान धर्मातील सार शोधून काढणारे, मक्का मदीनेची यात्रा करणारे ते पहिले हिंदू होते. गुरुनानक हे अत्यंत  प्रतिभासंपन्न  व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी जातीभेद रहित समाज रचना, दैनंदिन जीवनात आचारपावितत्र्य,हट योगातल्या शारीरिक क्लेशांचा निषेध,  एकेश्वरावर विश्वास,अस्पृश्यतेचे उच्चाटन आदी मूल्यांवर आधारित नवा धर्म प्रस्थापित केला. या धर्मामध्ये संन्यासी व्रताची आवश्यकता नाही हे सांगितले. व्यक्तीने समाजात राहून कर्तव्य निष्ठेने आणि पवित्र भावनेने कार्यरत राहावे ,गृहस्थाश्रमी जीवन जगावे, संसार करावा , व्यसनांच्या आहारी जाऊ नये, सत्य वचनी राहावे , अनिष्ट व दुष्ट रूढींचा त्याग करावा,परोपकार करावा, स्वतः पुरते धन ठेवून अतिरिक्त संपत्तीचे दान करावे, लौकिक जीवन पवित्र पद्धतीने जगावे अशी शिकवण त्यांनी दिली. परमेश्वराचे अस्तित्व मान्य करणे आणि त्यावर निष्ठा ठेवून प्रत्येक माणसाशी माणूस म्हणून व्यवहार करावा यासाठी गुरुनानक आग्रही होते.


'भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास ' (खंड आठ) मध्ये प्रा. डॉ. गजानन नारायण जोशी यांनी म्हटले आहे ,'शिखांच्या धर्मात मूर्ति पूजेला स्थान नसल्यामुळे धर्माच्या बऱ्याचश्या बाह्योपचारांचा फाफट पसारा आपोआपच कमी झालेला आहे. आणि त्यांची उपासना पद्धती साधी व सोपी झाली आहे .शिखांच्या धर्मसंहितेत सर्वात अधिक महत्त्व त्यांच्या सामूहिक प्रार्थनेला असते .इतर धर्माप्रमाणे शीख धर्माचेही नैतिक शुद्धी हे अविभाज्य अंग आहे. तसा शीख मनुष्य गूढवादी प्रवृत्तीचा नाही .तो वास्तववादी पण त्याचबरोबर सदाचरणी व आंतरबाह्य निर्मळ भावनेचा आणि आचरणाचा असतो. शिखांच्या धर्मग्रथात सत्संगतीवर खूप भर दिलेला आहे. नम्रता ,सहिष्णुता, तितिक्षा, सेवाधर्म, सदवचन,साधेपणा, कर्तव्यपरायणता, गुणग्राहकता, सत्य ,न्याय ,बुद्धी ,मैत्री ,दया या गुणांचे प्रत्येक व्यक्तीने आचरण करण्यावर शीख धर्माचा भर आहे.'


गुरुनानक यांनी आपल्या लेखनातून अनेक प्रकारचा महत्त्वाचा उपदेश केला आहे. तो आजही अनेक अर्थानी महत्त्वाचा आहे. त्यापैकी काही वचने अशी आहेत.१) सत्य हे निश्चितच उच्च आहे. पण सत्याच आचरण हेच परमोच्च आहे.२)साधुपुरुष सत्य तेच बोलतो कारण तो जे जे पाहतो तेच उच्चारतो.३)सत्याचा मार्ग हाच माझा पंथ होय. मी पंचमहाभूतांच्या जातीचा आहे. झाडे तोडली तरी आणि पृथ्वी खणली तरी ज्याप्रमाणे ती निश्चल असतात त्याप्रमाणे मी राहतो. नदी ज्याप्रमाणे तिच्या पात्रात फुले पडतात की दगड पडतात याची पर्वा करत नाही त्याचप्रमाणे मीही बेफिकीर असतो. चंदनाप्रमाणे जे सुवासिक तेच जीवन असे मी मानतो.४)माणसाने आपले डोके साफ करण्याची जरूर नाही.त्याने आपले मन साफ केलेपाहिजे.मृत्तिकेसमान लीन राहणे हाच खरा मन स्वच्छ राखण्याचा मार्ग आहे.५)सत्कृत्य हेच शेत. ईश्वर नाम हेच बी. सत्य मार्ग हेच पाणी असेल तरच निष्ठेची पालवी फुटते.


६)प्रेमरूपी शेत असू द्या. त्याला पावित्र्याचे पाणी घाला. सत्य आणि समाधान या दोन बैलांना नम्रतेच्या नांगराला जुंपा.स्वच्छ विवेक बुद्धी हा शेतकरी समजा.त्यातून कृपाप्रसादाचे अमाप पीक येईल.७)गर्व ,हाव  आणि हेकेखोरपणा यांची धुंदी चढलेली व्यक्ती मायाजाला फसते.८)माणसे धर्मग्रंथ वाचतात. प्रार्थना करतात.परंतु नंतर भांडणतंटे, मारामाऱ्या करतात. ते प्राण्यांची ,दगडांची पूजा करतात नंतर दांभिकाप्रमाणे बकध्यान करतात. तीन वेळा गायत्री मंत्र जपतात. अंग पवित्र वस्त्रलंकारानी भूषवतात. परंतु शिव्या देऊन तोंड विटाळतात.ते गळ्यात जपमाळ घालता.कपाळावर चंदन लावतात. भगवी वस्त्रे परिधान करतात .डोक्याला फेटा गुंडाळतात. पण सत्यस्वरूप ठाऊक नसेल तर हे सर्व बाह्यविधी निष्फळ आहेत.९)माणूस शुभशकुन, अपशकुन इत्यादी पाहत बसतो .पण त्याला हे ठाऊक नसते की असल्या क्षुल्लक बाबी परमेश्वराच्या हिशोबी नसतात.


१०)मडक्यात पाणी साठवून ठेवता येते.पण पाण्याशिवाय मडके तयार होते का? त्याचप्रमाणे ज्ञानसंचयाने मन ताब्यात ठेवता येते.११)पाणी जेवढे जास्त तेवढा मासा जास्त आनंदी आणि समाधानी असतो. सर्व तलाव काटोकाठ भरलेले असले तरीही चातक पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत बसतो. उकळताना आग सहन करून पाणी स्वतः नष्ट होते आणि दुधाला वाचवते. ही प्रेमभावना फार महत्त्वाची आहे.

१२)जो मर्त्य आहे पण अमर आहे .जो निद्रावस्थेत असून सुद्धा जागृत आहे. जो लुबाडला जात असतानाही जाणून बुजून प्रतिकार करत नाही. जो सुखदुःख समान मानतो. ज्याने राग, लोभ , मद, मत्सर यांच्यावर विजय मिळवलेला आहे, जो समाधीस्थ असतो तोच खरा साधू पुरुष होय.१३)जो अन्नत्याग करतो आणि परमेश्वर भक्तीचे सोंग आणतो त्याच्यापाशी उच्च गुणवत्ता नसते. कारण तेजपुंज शरीराशिवाय परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही .भक्ती मार्गातील आवश्यक गोष्टी म्हणजे स्वार्थत्याग, समाधान ,दया आणि सुस्वभाव आहेत, उपवास नव्हे.१४)जो इच्छांच्या सानिध्यात राहून सुद्धा निरिच्छ राहतो त्याला दुःखाची झळ पोहचत नाही. त्याला जन्म मृत्यूचे भय नसते.


इतर सर्व संतांप्रमाणे गुरुनानक यांच्याबाबत ही अनेक आख्यायिका व दंतकथा पसरल्या आहेत. त्यांना चमत्कारवादी ठरवून त्यांच्या चमत्कारांची चर्चाही काही कथा करतात. पण गुरुनानक हे स्थितीवादी नव्हते तर गतिवादी होते , इहवादी होते हे लक्षात घेतले पाहिजे. आज गुरु नानकांचा जात ,पात, पंथ,भेद निरपेक्ष असा माणसाकडे माणूस म्हणून बघणारा मानवतावादी धर्म विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. संत हे त्या त्या काळचे आदर्श लोकप्रतिनिधी होते असे मानले जाते. गुरुनानक हे असेच एक आदर्श लोकप्रतिनिधी संत होते.त्यांनी सर्व  समाजाला एक नवा मार्ग दाखवण्याचा केलेला प्रयत्न हा निश्चितच महत्त्वाचा आहे.त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)—————————————-

Post a Comment

Previous Post Next Post