डॉ. तुषार निकाळजे
नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. एका कार्यालयातील सभेमध्ये अधिकार मंडळाच्या एका सदस्याने कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दल त्या कार्यालयाच्या प्रशासन प्रमुखाला खडसावले. यावेळी त्या कार्यालयाप्रमुखांच्या डोळ्यात अश्रू आले व या प्रकारावरून ते गहिवरले. बातमी तशी भावनिक वाटते. परंतु याचा मागोवा घेतल्यास वेगळे चित्र पुढे येते.
प्रत्येक कार्यालयाच्या अधिकार मंडळांच्या व विश्वस्तांच्या दर सहा महिन्यांनी बैठका होत असतात. यावेळी कार्यालयीन कामकाजांचा आढावा घेतला जातो. जुन्या चुका, धोरणांवर चर्चा करणे, नवी धोरणे अंमलात आणणे, अशा वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत असते व आवश्यक वाटल्यास निर्णय देखील घेतले जातात. आपण सहजच व्यवहारात "डोळ्यात आनंदाश्रू येणे, गहिवरणे, ढसाढसा रडणे" असे शब्द वापरत असतो. या शब्दांमागे मानव जातीच्या व प्राण्यांच्या, झाडांच्या, फुलांच्या देखील भावना दडलेल्या असतात. परंतु व्यवस्थेतील गहिवरणे, डोळे पाणावणे, अश्रू अनावर होणे ही प्रतिक्रिया निव्वळ कृत्रिम व राजकीय असते.
तसेच काहीतरी या कार्यालयातील बैठकीच्या वेळी झाले असावे. कार्यालय प्रमुखांनी कामगारांच्या विरुद्ध अधिकार मंडळाने बोलल्यानंतर त्यांना गहिवरून आले व त्यांचे डोळे पाणावले. या अधिकाऱ्याच्या कामकाजाचा पाच वर्षातील अनुभव पाहिल्यास हा प्रकार निव्वळ कृत्रिम वाटतो. या अधिकाऱ्याला पंधरा ते वीस दिवस सेवानिवृत्तीला उरलेले असताना असे घडणे म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळी आणखी एखादी चौकशी समिती नेमली जाते का? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण यापूर्वी या अधिकाऱ्याच्या ज्यादा मानधनावर चौकशी समिती नेमल्याचे निदर्शनास येईल, तसेच बऱ्याच वेळा चुकीच्या निर्णयामुळे मंत्री महोदयांनी कान उघाडणी केल्याचे निदर्शनास येईल, स्वतःच्याच कार्यालयातील चुकीच्या नोटीस बोर्ड वरील वर्तमानपत्रातील बातमी यामुळे अडचणीत आलेला हा अधिकारी डोळ्यात पाणी आणण्याचे किंवा गहिवरण्याचे सॉंग घेतात. बऱ्याच वेळा काही कार्यालयांच्या जागा चित्रपट, नाटक, रॅप सॉंग यांच्याकरता भाड्याने घेतल्या जातात.
यामध्ये अनियमितता दृष्टीस पडल्याने चौकशी समिती नेमली जाते. काही वेळा पोलीस प्रशासनाकडे तक्रार देखील दाखल होतात. प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होते. परंतु हे सर्व सिस्टिमॅटिकपणे दडपले जाते. चित्रपट, नाटक किंवा रॅप सॉंग मधील कलाकार नाईलाजाने डोळ्यातील अश्रू येण्याचे नाटक करण्यासाठी ग्लिसरीनचा वापर करतात. परंतु आता हल्ली व्यवस्थेतील काही हिरो ग्लिसरणची बाटली खिशात ठेवून अधिकार मंडळांच्या बैठकीला जातात का? असा प्रश्न उपस्थित होतो आणि वेळप्रसंगी या ग्लिसरीनचे दोन थेंब डोळ्यात टाकून डोळे पाणवल्याचे दर्शन घडवितात. परंतु जनतेलाही या गोष्टींची सवय झालेली असल्याने या गोष्टींकडे "मगर मच्छके आसू बहाना" असेच पाहिले जाते.