बिद्री उपकेंद्रास व काळम्मावाडी उपसा केंद्रास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

काळम्मावाडीतून पाणी पुरवठा सुरळीत सुरु


प्रेस मीडिया लाईव्ह :

संभाजी चौगुले :

कोल्हापूर ता.28 : बिद्री उपकेंद्रात तसेच काळम्मावाडी उपसा केंद्राजवळील उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने याठिकाणी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सकाळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सदरचा तांत्रिक बिघाड तात्काळ शोधून पंप सुरु करण्याच्या सूचना दिल्या. तसेच काळम्मावाडी येथील उपसा केंद्रात दुसरा पंपही आज रात्री 11 वाजेपर्यंत कार्यान्वीत करण्याच्या सूचना जल अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना दिल्या. दुसरा पंप सुरू झाल्यानंतर या पाईप लाईनद्वारे एकूण 140 एमएलडी पाणी पुरवठा केला  जाणार आहे.

      



   थेट पाईपलाईन योजनेद्वारे गेले काही दिवस एका पंपाद्वारे शहराला पाणी पुरवठा सुरु होता. सोमवारी काळम्मावाडी येथील सब स्टेशनमध्ये व बिद्री येथील उपकेंद्रात काही तांत्रिक बिघाड झाल्याने काळम्मावाडी येथील उपसा पंप बंद ठेवावा लागला. परिणामी ई वॉर्डमध्ये केला जाणारा पाणी पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे महापालिकेने तात्काळ शिंगणापूर योजनेमधून पाणी पुरवठा सुरळीत केला. प्रशासकांनी दिलेल्या सुचनेनुसार उपसाकेंद्रातील दुरुस्तीचे काम आज पुर्ण करुन पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत सुरु करण्यात आला आहे. यातील पहिला पंप दुपारी 1 वाजता सुरु करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसरा पंप जोडून त्याची ट्रायल घेण्याचे काम सुरु आहे. हाही पंप लवकरात लवकर सुरु करुन शहराला दोन पंपाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन पाणी पुरवठा विभागामार्फत केले जात आहे.  यावेळी शाखा अभियंता संजय नागरगोजे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post