टी पी विभागाचे अधिकारी न फिरकल्याने एक तास रस्ता बंद
प्रेस मीडिया लाईव्ह :
हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल हा शहरातील नागरिकांना, विशेषतः शहरात येणाऱ्या चाकरमन्यांसाठी महत्वाचा रस्ता आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून हा रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे.
तसेच याच रस्त्यावरील बँक शिपाई कॉलनी येथील वळणावर अठरा मीटर रस्ता न्यायालयिन दाव्यात अडकल्याने अनेक वर्षे होऊ शकला नव्हता. परंतू हा दावा महापालिकेच्या बाजूने लागला आहे. यामुळे रस्ता डी पी लेआऊट प्रमाणे व्हावा अशी मागणी आम आदमी पार्टीने केली.
या मागणीसाठी बँक शिपाई कॉलनी येथे निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधले. टी पी विभागाच्या अख्त्यारीत विषय असून देखील त्यांचा एक ही अधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने आप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून रस्ता रोको केला. तब्ब्ल एक तास आंदोलन सुरु राहिल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अखेर टी पी कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता मयुरी पटवेगार यांनी आंदोलनस्थळी येऊन सहाय्यक रचनाकार विनय झगडे यांच्या बरोबर बैठकीचे निमंत्रण दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आहे. झगडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत, कोर्टाचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला आहे, तरीही यावर कार्यवाही का होत नाही असा सवाल शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला. नवीन वर्क ऑर्डर काढताना रस्ता डी पी लेआऊट प्रमाणेच झाली पाहिजे, त्यासाठी रस्त्यातील अतिक्रमण काढले पाहिजे अशी मागणी केली.
यावर झगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन पुढील आठवड्यात बैठक घेऊ, तसेच कोर्टाच्या निकालावर विधी विभागाचा अभिप्राय घेऊन संबंधित बांधकाम काढण्या संदर्भात निर्णय घेऊ असे आप पदाधिकाऱ्यांना सांगितले.विभाग प्रमुख मयूर भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, विजय हेगडे, समीर लतीफ, डॉ. कुमाजी पाटील, रवींद्र राऊत, रवींद्र ससे, नाझील शेख, रणजित पाटील, उमेश पालकर, प्रशांत रुगे, अरुण शिंदे, धीरज खाडे, शामराव खोत, प्रशांत रावण, विनायक पाटील, विनायक बोटे आदी उपस्थित होते.