ग्राहकांच्या नियमित वीज बिल भरण्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची कामगिरी अव्वल - स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांचे मत



प्रेस मीडिया लाईव्ह :

संभाजी चौगुले : 

कोल्हापूर परिमंडळ :  घरगुती, औद्योगिक आणि कृषी ग्राहकांकडून नियमित वीज भरणा होणे व महावितरणसह ऊर्जा कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची विजेच्या क्षेत्रात अव्वल कामगिरी झाली आहे. वाढत्या वीज मागणीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पाठिंब्याने जिल्ह्यासाठी हाती घेतलेली दोन हजार कोटी रुपयांची आरडीएसएस ही विकास योजना यशस्वीरित्या अंमलात आणून कोल्हापूरने वीज क्षेत्रातील आघाडी कायम राखावी, असे एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांनी रविवारी कोल्हापूर येथे सांगितले. 

 महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादिकर, प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता परेश भागवत, महापारेषणचे मुख्य अभियंता चिदाप्पा कोळी आणि महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक एस. ए. पाटील उपस्थित होते.

  मा. विश्वास पाठक म्हणाले की, नवीन वीज कनेक्शन देणे, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, वीज बिलांची वसुली अशा बाबतीत कोल्हापूर जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे. जिल्ह्यातील वीज अपघातांची संख्याही कमी होत आहे. जिल्ह्यातील कामगिरी राज्य विद्युत आयोगाने ठरविलेल्या निकषांनुसार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि विशेषतः आगामी काळातील वाढत्या उद्योग व्यवसायांमुळे निर्माण होणारी विजेची मागणी ध्यानात घेऊन जिल्ह्यात नवीन वीज उपकेंद्रे उभारणे आणि विजेचे जाळे मजबूत करण्यासाठी योजना आरडीएसएस अंतर्गत राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कामगिरी इतरांसाठी अनुकरणीय आहे.

  त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलिअन डॉलर्सवर नेण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलिअन डॉलर्सचा असेल. आर्थिक विकास अधिकाधिक होईल आणि लोकांचे राहणीमान वाढत जाईल तशी विजेची मागणी वाढत जाईल. त्यामुळे मोदी सरकारने देशभरातील विजेचे जाळे मजबूत करण्यासाठी आरडीएसएस ही योजना लागू केली आहे. त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात ४२ हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. त्याच प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातही कामे हाती घेण्यात आली आहेत. आगामी दोन वर्षात ही कामे पूर्ण झाल्यानंतर अधिक दर्जेदार वीज पुरवठा होईल.

    ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी लागू केलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान असून राज्यासाठी गेम चेंजर असेल. या योजनेत सौर ऊर्जेचा वापर करून खासगी गुंतवणुकीतून सात हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येईल. त्यापैकी साडेतीन हजार मेगावॅटची टेंडर प्रसिद्ध झाली आहेत.

   मा. प्रकाश आवाडे यांनी सांगितले की, इचलकरंजी व परिसरात आगामी काळात येणाऱ्या गुंतवणुकीमुळे उद्योगांची वीज मागणी वाढेल व त्यानुसार विद्युत पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करावी. मा. परेश भागवत, मा. चिदाप्पा कोळी व मा. एस. ए. पाटील यांनी अनुक्रमे महावितरण, महापारेषण व महाऊर्जा यांच्या जिल्ह्यातील कामगिरीचे सादरीकरण केले.

Post a Comment

Previous Post Next Post