प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
कोल्हापूर: राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी १ डिसेंबरपासून दररोज ऑनलाईन स्वरूपात नोंदविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्यातील शाळांना दिले आहेत . स्विफ्ट चॅट या अॅपद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना यापुढे मोबाईलवर विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे.
राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. केंद्रामार्फत चॅटबॉटच्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्रस्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. हजेरी नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत पर्यवेक्षकीय यंत्रणा नियमितपणे आढावा घेणार आहे. प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार चॅटबॉटद्वारे इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवावी लागणार आहे. हजेरी नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आयडीचा वापर करावा लागणार आहे. तर शिक्षकांना शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा लागणार आहे. मोबाईल क्रमांक बदलल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करण्याची सूचना दिली आहे.
सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आयडी उपलब्ध असलेल्या शिक्षकांना चॅटबॉटवर विद्यार्थी हजेरी नोंदविता येणार आहे. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना चॅटबॉटवर विद्यार्थी हजेरी नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येणार आहे. चॅटबॉटवर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी 7 ते दुपारी 12, तर अन्य शाळांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत विद्यार्थ्यांची हजेरी नोंद करता येणार आहे. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी चॅटबॉटवर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेणार आहेत. ऑनलाईन हजेरी नोंदविताना येणाऱ्या अडचणी लिंकवर नोंदविता येणार आहेत.
चॅटबॉटद्वारे हजेरी नोंदविताना शालेय क्रमांकासाठी अडचणी आल्यास इतर शिक्षकांचा शालेय क्रमांक वापरूनही ऑनलाइन हजेरी नोंदवावी, विद्यार्थी हजेरी नोंदविताना अडचणी येत असल्यास शालेय संकेतस्थळ, सरल संकेतस्थळ, यू-डायस या सर्व संकेतस्थळांतील माहिती अद्ययावत करावी. सर्व संकेतस्थळांवरील अडचणी दूर होतील, असे शिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.
प्रतिक्रिया
१) के.जी.पाटील सर , संस्थापक अध्यक्ष- संकल्प माध्यमिक विद्यालय कोल्हापूर,
स्विफ्ट चॅट च्या माध्यमातून शिक्षकानी रजिस्ट्रेशन करण्याची ही पद्धत अतिशय सोपी आहे.सरल वरील संपुर्ण डाटा या ॲप वर उपलब्ध होणार असून शाळांची संपूर्ण माहिती एकत्रित मिळणार असल्यामुळे याचा माहिती संकलनासाठी सर्वांनाच फायदा होणार आहे .शासनाचा हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे.