एक व्यासंगी तत्त्वज्ञान डॉ.ज.रा.दाभोळे

 


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

तत्त्वज्ञानाचे गाढे व्यासंगी अध्यापक,समाजवादी प्रबोधिनीचे कार्यकारणी माजी सदस्य ,प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे माजी संपादक मंडळ सदस्य , या मासिकातील 'वाचा व विचार करा ' या गाजलेल्या या सदराचे लेखक, देश-विदेशातील अनेक विद्यापीठात तत्त्वज्ञानाची मांडणी करणारे अभ्यासक, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ.ज.रा.दाभोळे हे कोल्हापूर येथे १ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाच्या ८३  व्या वर्ष कालवश झाले. गेले अनेक महिने ते अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या निधनाने तत्वज्ञानातील एक व्यासंगी अभ्यासक, एक समाजभानी लेखक आणि वर्तमानाचा परखड भाष्यकार काळाच्या पडद्याआड झाला आहे. त्यांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराचे विनम्र अभिवादन..!


१ मे १९४० रोजी त्यांचा जन्म झाला होता. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे हे त्यांचे जन्मगाव. ते लहान असतानाच व्यवसाय निमित्त त्यांचे कुटुंब पुण्याला गेले. त्यामुळे दाभोळे सरांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. पुढे चार-पाच वर्षात हे कुटुंब पुण्याहून कराडमध्ये स्थायीक झाले. आणि दाभोळे तिथे शिकले. कराडच्या सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयातून ते बीए झाले. कोल्हापुरात राजाराम कॉलेजमधून त्यांनी एम.ए.ही तत्वज्ञान  विषयातील पदवी मिळवली. या काळात गरीबीमुळे त्यांनी कापडाच्या दुकानात कामही केले. कर्मवीर भाऊराव पाटील, बॅ. पी.जी.पाटील ,डॉ.जे. पी.नाईक  यांचे मार्गदर्शन त्यांना या काळात लाभले. १९६६ त्यांनी कराडच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या अध्यापनाला सुरुवात केली. नंतर कोरेगाव ,सातारा येथे अध्यापनाचे काम करून कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात तत्त्वज्ञान विभाग प्रमुख म्हणून ते ३० एप्रिल २००० रोजी निवृत्त झाले. त्यांच्या दोन कन्या, जावई ,नातवंडे अमेरिकेत स्थायिक आहेत.


त्यांचे वडील सत्यशोधक समाजाचे पुरस्कार होते तर मातोश्री वारकरी संप्रदायाच्या संस्कारात वाढलेले होत्या या वातावरणामुळे तत्वज्ञानाबद्दलची एक जिज्ञासा दाभोळे सरांना लहानपणापासूनच लाभलेली होती. माध्यमिक शिक्षणाच्या वेळी त्यांनी संस्कृत शिकून घेतलेले होते. तत्त्वज्ञान विषय शिकत असताना त्यांना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ,मे. पु .रेगे ,श्रीनिवास दीक्षित आदी दिग्गजांचे मोठे मार्गदर्शन मिळाले. ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध तत्त्वज्ञानाचे केलेले विश्लेषण ' हा प्रबंध शिवाजी विद्यापीठाला सादर करून त्यांनी डॉक्टरेट ही १९९७ साली पदवी मिळवली. शिवाजी विद्यापीठाच्या विविध अध्यासन केंद्रातही त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले.


डॉ.दाभोळे यांनी समाजवादी प्रबोधिनीचे 'प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिक, प्राज्ञ पाठशाळेचे नवभारत हे नियतकालीक,सुगावा मासिक समाज प्रबोधन पत्रिका हे  त्रैमासिक यामध्ये सातत्यपूर्ण लेखन केले त्याच पद्धतीने विविध वृत्तपत्रात ताज्या घडामोडींवरील लेख लिहिले आणि ग्रंथरूपानेही लेखन केले. समाजविज्ञान कोश, विश्वचरित्र कोश यासाठीही अनेक नोंदी लिहील्या.ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असले तरी त्यांचे लिखाण सोपे ,सुबोध, वर्तमानाशी सांगड घालणाऱ्या स्वरूपाचे होते. तत्त्वज्ञान विषयातील जागतिक पातळीवरील विचारवंतांच्या विचारांचा त्यांचा व्यासंग होता. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञान हे त्यांचे अभ्यास विषय होते. मानवजातीच्या सर्वांगीण विकासासाठी तत्वज्ञाना खेरीज तरणोपाय नाही हा विचार ते सातत्याने मांडत असत. भारतातील विविध राज्यांसह श्रीलंका, अमेरिका, ग्रीस आधी अनेक देशांत त्यांनी विविध परिषदात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी निवडणुकही लढवून पाहिली.


डॉ.ज.रा.दाभोळे तरुण अभ्यासकांना सातत्याने मार्गदर्शन करत असत.विज्ञानाच्या विविध संकल्पना इकडे विश्लेषणाच्या अंगाने त्यांनी सातत्याने मांडणी केली. आपल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी भटक्या, विमुक्त, वंचित, बहिष्कृत वर्गाच्या प्रश्नांच्या मांडणीसाठी सातत्याने केला. फुले आंबेडकरांचा जात व धर्म मांडणीचा विचार, गांधीजींचा सत्य अहिंसा विचार, कर्मवीर अण्णांचा शिक्षण विचार ते सातत्याने पुढे नेत राहीले. गेल्या काही वर्षात त्यांना निरनिराळे आघात सहन करावे लागले. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर निश्चितच झाला. त्यांच्या निधनाने पुरोगामी परिवर्तनवादी विचाराची मोठी हानी झाली आहे. प्रबोधनाच्या चळवळीचा एक मार्गदर्शक आपण गमावला आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post