धोंडिबा कुंभार यांना राष्ट्रीय आदर्श सरपंच प्रेरणा पुरस्कार जाहीर

 


इचलकरंजी : प्रतिनिधी : 

बेळगांव येथील आधार सोशल फौंडेशनच्या वतीने सर्व श्रमिक महासंघाचे कार्यकर्ते व बटकणंगले गांवचे लोकनियुक्त सरपंच धोंडिबा कुंभार यांना राष्ट्रीय आदर्श सरपंच प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला.


बटकणंगले गांवचे सुपूत्र असलेले धोंडिबा कुंभार यांनी कष्टकरी,श्रमिक , कामगारांच्या न्याय - हक्कासाठी काम करतानाच समाजात न्याय,समता व‌ बंधुता प्रस्थापित होण्यासाठी सुरु असलेल्या कार्यात नेहमीच सक्रिय भूमिका घेतली आहे.याशिवाय कामगार चळवळीतील जेष्ठ व अभ्यासू कामगार नेते डॉ.अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली सर्व श्रमिक महासंघाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी ,आशा कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी 


लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन,मोर्चे काढून शासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवला आहे.या प्रयत्नाला ब-याच प्रमाणात यश आले असून आता उर्वरित मागण्या मार्गी लावण्यासाठी त्यांचा अविरत लढा सुरु आहे.विशेष म्हणजे गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले गावच्या लोकनियुक्त सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.


या पदाच्या माध्यमातून त्यांनी अल्पावधीतच लोकसहभागातून गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यामुळे गाव आता विकासाची कात टाकून सर्वांगीण व शाश्वत विकासाकडे वाटचाल करत आहे.या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच बेळगावच्या आधार सोशल फौंडेशनच्या वतीने सरपंच धोंडिबा कुंभार यांना राष्ट्रीय आदर्श सरपंच प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचे वितरण रविवार दि.५ नोव्हेंबर रोजी पुण्यात एका शानदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती  फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विक्रम शिंगाडे यांनी एका प्रसिध्दी पञकाव्दारे दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post