प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर शाळा क्रमांक २४, रफीक अहमद किडवाई विद्यामंदिर शाळा क्रमांक ४५ ( उर्दू शाळा) व महात्मा गांधी विद्यामंदिर शाळा क्रमांक १८ (टेलिफोन भवन) समोर या महानगरपालिकेच्या तीन शाळांना भेट दिली.
या भेटीप्रसंगी आयुक्तांनी शाळेच्या मुख्याध्यापकां कडुन शाळेची सविस्तर माहिती घेऊन पट संख्या कमी असल्याने संबंधित शाळांच्या पट वाढीसाठी मुख्याध्यापकांना सक्त सूचना केल्या. तसेच शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधांच्या गैरसोयीची सविस्तर माहिती जाणून घेऊन महानगरपालिकेच्या शाळेवर शहरातील सर्व सामान्य कुटुंबातील मुलांचे शिक्षण अवलंबून असल्याने या मुलांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी तातडीने संबंधित विभाग प्रमुखांना सुचना दिल्या.
यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी अजयकुमार बिरनगे, शिक्षण पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांचे सह संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.