प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२६ ,' आम्ही भारतीय लोक 'अशी सुरुवात करून ' स्वतः प्रत अर्पण करीत आहोत ' असा समारोप करणारा भारतीय राज्यघटनेचा सरनामा हाच भारतीय विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका या साऱ्याचा मुख्य गाभाघटक आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, संघराज्यीय एकात्मता आदी सर्व मूल्ये महत्वाची आहेत.
समाजातील शेवटच्या माणसाला विकासाची संधी मिळावी हा संविधान कर्त्यांचा हेतू आहे.संविधानाने नमूद केलेले अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याचे कर्तव्य भावनेने सर्वांनी पालन करण्याची गरज आहे. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक लोकशाहीचा,सामाजिक न्यायाचा , दर्जाच्या व संधीच्या समतेचा आग्रह अत्यंत महत्वाचा आहे. संविधान मंजुरीच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना आपण हा आशय अधिक ताकदीने पुढे घेऊन जाण्याची गरज आहे,असे मत ज्येष्ठ अभ्यासक अशोक केसरकर यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात 'संविधानाचे तत्वज्ञान ' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.रमेश लवटे होते. प्रारंभी रामभाऊ ठिकणे यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
अशोक केसरकर म्हणाले, नागरिक जेवढा सुज्ञ तेवढी घटनेची अंमलबजावणी काटेकोरपणाने करता येऊ शकेल. म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याची नितांत गरज आहे.केसरकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया,तिचे तत्वज्ञान आणि तिच्या मूल्यांच्या आग्रही व काटेकोर अंमलबजावणीची गरज प्रतिपादीत केली.अध्यक्षीय स्थानावरून बोलताना प्रा.रमेश लवटे म्हणाले, भारतीय राज्यघटना हा माणसाला योग्य प्रकारची संधी देणारा एक महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आहे. सर्वांगीण समता आणि समानतेच्या अंमलबजावणीसाठी संविधान साक्षरतेची नितांत गरज आहे.
यावेळी अन्वर पटेल, राजन मुठाणे, डी.एस. डोणे, पांडूरंग पिसे, दयानंद लिपारे,सचिन पाटोळे,शकील मुल्ला,शहाजी धस्ते, गजानन पाटील,रशीद मुल्लाणी नौशाद शेडबाळे यांनी आभार मानले.