. तोच वसा आणि वारसा आजच्या वृत्तपत्र पत्रलेखकांनीही पुढे नेला पाहिजे -प्रा. डॉ. अवनीश पाटील

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी ता.५ वृत्तपत्र पत्रलेखन काळाच्या प्रवासात एक महत्त्वाचे इतिहास संशोधनाचे साधन ठरत असते. त्याचे संदर्भ मूल्य मोठे असते. पावणे दोनशे वर्षांपूर्वी लोकहितवादीनी 'प्रभाकर 'मधून लिहिलेल्या शतपत्रात लाचखोरी, अंधश्रद्धा, कायदा, समाजशास्त्र ,राजकारण, धर्मसुधारणा,समाजसुधारणा ,ज्ञान-विज्ञान इत्यादी विषयाची मांडणी केली होती.


 या सर्व विषयांचे महत्त्व आजही वाढत्या स्वरूपात आहे. अन्याय व अत्याचारा विरोधात लेखन करणारे वृत्तपत्रलेखक समाजाला नैतिकतेची संकल्पना देत असतात, लोक जाणीव समृद्ध करत असतात आणि सार्वजनिक चर्चाविश्व व्यापक करत असतात. हे लोकहितवादीं उर्फ गोपाळ हरी देशमुख यांच्या वृत्तपत्र पत्रलेखनातून दिसून येते. तोच वसा आणि वारसा आजच्या वृत्तपत्र पत्रलेखकांनीही पुढे नेला पाहिजे असे मत शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अवनीश पाटील यांनी व्यक्त केले. ते लोकहितवादींचे २००जन्मवर्ष आणि वृत्तपत्र लेखक संघाचा २६ वर्धापन दिन या निमित्ताने आयोजित व्याख्यानात ' लोकहितवादींची शतपत्रे आणि आजचे वृत्तपत्र पत्रलेखन ' या विषयावर बोलत होते. 


शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉअरुण भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. स्वागत मनोहर जोशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पांडुरंग पिसे यांनी करून दिला. प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रा.डॉ.अवनीश पाटील व अन्य मान्यवरांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रारंभी प्रा. डॉ. ज . रा. दाभोळे , राजाभाऊ शिरगुप्पे, बाबा महाराज सातारकर व अमित सातपुते यांना आदरांजली वाहण्यात आली.


प्रा.डॉ.अवनीश पाटील म्हणाले, लोकहितवादीनी पावणेदोनशे वर्षांपूर्वी जातरहित ,वर्णरहीत संसदीय लोकशाहीची मागणी केली होती. प्रत्येक गोष्ट उपयुक्ततावादाच्या कसोटीवर ते पारखून घेत असत. धर्म सुधारणा आणि समाज सुधारणा यांचा घनिष्ठ संबंध असतो.बुद्धीप्रमाणे वाद हाच खरा ज्ञानमार्ग आहे. अशा सर्वसामान्य जनतेची बाजू मांडणारे अनेक विचार लोकहितवादी आपल्या पत्रलेखनातून सातत्याने मांडत राहिले.न्यायमूर्ती रानडे, समाजसेवक गोपाळ कृष्ण गोखले, सुधारकाग्रणी आगरकर या वैचारिक परंपरेचे अग्रदूत म्हणून लोकहितवादींनी फार मोठी भूमिका बजावली. त्यांची पत्रकारिता व वृत्तपत्र पत्रलेखन हे समाजाला पुढे नेणारे होते.


प्रा.डॉ.अवनीश पाटील पुढे म्हणाले, आज माध्यमांचे व्यापारीकरण झालेले आहे. सत्या पेक्षा श्रद्धा आणि भावना यांना महत्त्व प्राप्त झाले. स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज सुधारकांनी केलेले काम आणि स्वातंत्र्य लढ्याने केलेले काम पुसले जात आहे. अशावेळी वृत्तपत्र पत्र लेखकांनी सत्याचा अंकुर जपण्याची व जोपासण्याची लोकहितवादींची भूमिका पुढे नेली पाहिजे. इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघ गेले पाव शतक हे काम करत आहे हे कौतुकास्पद आहे. प्रा. डॉ.अवनीश पाटील यांनी आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण भाषणामध्ये वृत्तपत्र पत्रलेखनाचा इतिहास, वर्तमान व भविष्य याची मांडणी केली. समाजवादी प्रबोधिनीत झालेल्या या कार्यक्रमास डॉ. भारतभूषण माळी ,डॉ. दत्तात्रय माचले, गुरुनाथ म्हातुगडे, पंडित कोंडेकर ,नारायण गुरबे, रमेश सुतार ,अभिजित पटवा,संजय भस्मे, महेंद्र जाधव , महादेव  मिणची,दिगंबर उकिरडे, दीपक पंडित अन्वर पटेल, सचिन कांबळे, अशोक केसरकर,नौशाद शेडबाळे, सचिन पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नारायण गुरबे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post