प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरात नागरिकांच्या कडून स्वच्छता विषयक तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्याने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज गुरुवार दि.१९ ऑक्टोंबर रोजी उपायुक्त सोमनाथ आढाव आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चारही विभागीय कार्यालया कडील मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता पर्यवेक्षक, वॉर्ड इन्स्पेक्टर यांच्या समवेत बैठक आयोजित करणेत आली होती.
बैठकीच्या प्रारंभी उपायुक्त सोमनाथ आढाव यांनी शहरातील नागरिकांच्या कडून प्राप्त होत असलेल्या स्वच्छता विषयक तक्रारींचा आढावा घेऊन सदर तक्रारींचा निपटारा तातडीने करणेच्या सुचना दिल्या.
सदर बैठकीत नागरिकांच्या कडून प्राप्त होत असलेल्या स्वच्छतेच्या तक्रारीबाबत तसेच विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या स्वच्छता विषयक तक्रारींच्या वृत्ताबाबत आयुक्त यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन अतिरिक्त मनुष्यबळ तसेच आवश्यक यंत्रणा लावुन येत्या तीन दिवसांत संपूर्ण शहरात साठलेल्या कचऱ्याचा उठाव करावा अन्यथा संबंधित मक्तेदाराचे देयक अदा करण्यात येणार नाही असा इशारा दिला. त्याचबरोबर आरोग्य विभागाकडील सर्व स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी, मुकादम यांनी आपल्या वॉर्डातील स्वच्छता विषयक कामासाठी आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वर पुर्णपणे नियंत्रण ठेवुन आपला भाग स्वच्छ आणि सुंदर राहील याची खबरदारी घ्यावी अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करणेचा इशारा दिला. तसेच यापुढे आरोग्य विभागाची साप्ताहिक बैठक घेणेत येईल आणि नियमाप्रमाणे काम न झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणेचा इशारा सुद्धा आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी दिला.
Tags
इचलकरंजी