63 स्वच्छता कर्मचारी व 1 आरोग्य निरिक्षक गैरहजर असल्याने 1 दिवसाची पगार कपात
संभाजी चौगुले :
कोल्हापूर ता.25 : महापालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बुधवारी पहाटे 6.00 वाजता ई वॉर्ड मधील कावळा नाका व रुईकर कॉलनी येथील आरोग्य निरिक्षक यांच्या कार्यालयात अचानक भेट दिली. यामध्ये ई वॉर्ड कावळा नाका कडील 49 व रुईकर कॉलनीकडील 14 असे 63 स्वच्छता कर्मचारी व 1 आरोग्य निरिक्षक हे अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी गैरहजर कर्मचा-यांचा दि.25 ऑक्टोंबर 2023 रोजीचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड यांना दिले. यामध्ये ताराबाई पार्क, नागाळा पार्क, एस.टी.स्टॅन्ड परिसर, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसरातील 63 स्वच्छता कर्मचारी व रुईकर कॉलनी कडील आरोग्य निरीक्षक मुनीर फरास हे ही अनुउपस्थित असलेने निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर सर्व आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरिक्षक यांचे अधिनस्त कर्मचारी अनुपस्थित असल्यास त्यांची तात्काळ विनावेतनचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्य आरोग्य निरिक्षक यांना दिले आहेत.
त्याचबरोबर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी विभागीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे नियंत्रण अधिकारी उप-आयुक्त व सहा.आयुक्त यांनी दैनंदिन कामकाज पाहताना आपण विभागीय कार्यालयाअंतर्गत आरोग्य विभागाकडील सॅनिटेशन वॉर्डचेही नियंत्रण करणेचे आहे. यामध्ये सैनिटेशन वॉर्डमध्ये दैनंदिन उपस्थित कर्मचा-यांची पाहणी करून त्यांचेवर नियंत्रण ठेवणे, प्रभाग क्षेत्रातील आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांच्या हजेरीच्या ठिकाणी आठवड्यातून किमान दोन वेळा सकाळी आकस्मीक भेट देऊन पाहणी करणे, त्याचा अहवाल इकडील कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त क्र.१ व 2 यांनी शहरातील सॅनिटेशन वॉर्डच्या हजेरीच्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश पारित केले आहेत.
Tags
कोल्हापूर