प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर ता.२० बळकट बाहू उभारून नभ पेललेस शाहू,
तू दलितांच्या दुःखाचे स्वर जाणलेस शाहू...
एकामागून एक गझलचे शेर सादर होत होते.अवघे रसिक रंगून गेले होते. निमित्त होते भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाच्या औचित्याने होत असलेल्या वाचन प्रेरणा दिनाचे...गझलकार होते ज्येष्ठ कवी, पत्रकार, लेखक श्रीराम पचिंद्रे.
सूर्यपंख तू दिलेस आम्हां नव्या जाणिवांचे
झेप घ्यायला नवे नभांगण दावलेस शाहू...
‘शाहू’ ह्या गझलेबरोबरच हा मुशायरा रंगतच गेला. ‘गझलसाद’ समूहाच्यावतीने हा गझल मुशायरा आयोजित करण्यात आला होता. आरंभी समाजवादी प्रबोधिनीचे सचिव कवी प्रसाद माधव कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. वास्तुविशारद आणि कवी नरहर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ‘कोल्हापूर माझा’ ह्या यु ट्युब वाहिनीचे राजेंद्र कोरे यांनी श्री. पचिंद्रे यांचा सत्कार केला. हा मुशायरा यू ट्यूबवर थेट प्रक्षेपितही करण्यात आला.
आपल्या समाजातील जातिव्यवस्थेवर भाष्य करणारा-
‘जात’ काहीही करा पण जात नाही,
जातिअंताची खरी सुरुवात नाही
असे सांगून ज्याचा त्याचा वाटा नीट पोहोचता झाला, की, भ्रष्टाचाराद्दल कुणाचंच काही गार्हाणं नसतं, असं सांगून
भ्रष्ट तोची जो न वाटा नीट देतो
यात कसली खंत कोण खात नाही
असा शेर सांगून दाद मिळवली. समाजातल्या प्रखर वास्तवाचे दर्शन घडवणार्या शेरांबरोबरच मृदु भावांची पखरणही त्यांनी केली.
हे द्यायचेच आहे देणे तुझे पुराणे
देतो तुझ्या नभाला आता नवेच गाणे
असा हळवा प्रेमभाव प्रकट करणार्या गझलेतील
हे कर्ज फेडताना का वाढतेच आहे?
माझा हिशोब झाला, तू मांडल्याप्रमाणे
असा प्रेमातला परखड वास्तववादही त्यांनी मांडला.
गझल लेखनातले, पत्रकारितेतले, संपादनातले विविध अनुभव आणि विनोदी किस्से सांगत श्री. पचिंद्रे यांनी हा मुशायरा रंगवत नेला.
काही बोलणे निरर्थ मूक राहणेही व्यर्थ
अशा नपुंसक गावा सार्या अर्थांचे अनर्थ
असे सांगत निष्क्रिय व्यवस्थेवर आघात केले. अशा विविध भावच्छटांच्या शेरांनी ह्या मैफिलीत रंग भरला. मुशायर्यास डॉ. दिलीप पां. कुलकर्णी, महेश भोपळे, अॅड. सी. बी. कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
कोल्हापूर