अखेरचा मोगल बादशहा शायर बहादूर शहा जफर





प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com


गाजियोमे बू रहेगी जब तलक ईमान की 
तब तो लंदन तक चलेगी तेग हिंदोस्तान की...

(जोपर्यंत इथल्या शुर सैनिकांमध्ये प्रामाणिकपणा, इमानदारी ,देशप्रेम यांचा अंश शिल्लक आहे तोपर्यंत हिंदुस्थानची तलवार थेट लंडनपर्यंत जाऊन भिडेल.) असे लिहिणाऱ्या आणि १८५७  च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये ब्रिटिशांविरोधी लढ्याचे ज्यांनी नेतृत्व केले ते दिल्लीचे अखेरचे मोगल सम्राट बहादुर शहा जफर एक महान गझलकार होते .२४ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन. २४ ऑक्टोबर १७७५ रोजी त्यांचा जन्म झाला. आणि ७ नोवेंबर १८६२ रोजी ते कालवश झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी इंग्रजांशी लढा देणारा हा शायर ब्रिटिशांच्या हद्दपारीत नजरकैदेत रंगून येथे मृत झाला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या अनेक गझला त्यांनी लिहिल्या. एका गझलेत ते म्हणतात ,

लगता नही है जी मेरा उजडे दयार मे
 किसकी बनी है आलमे नापाए दार मे..

(हे जग आता स्मशानवत ओसाड झाले आहे.इथे मला अजिबात करमत नाही.या नश्वर जगात कुणाचं काय चांगल झालय?)

उम्रे दराज मांग के लाये थे चार दिन
दो आरजू में कट गये दो इंतजार मे...

(मी विधात्यापासून चार दिवसांचे दीर्घायुष्य मागून घेतले होते.पण त्यापैकी दोन दिवस इच्छा व्यक्त करण्यात आणि उरलेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले.)

है कितना बदनसीब जफर दफ्न के लिए 
दो गज जमीन मिल न सकी कू ए यार में...

(हा जफर किती कमनशिबी आहे बघा ,त्याला गाडण्यासाठी सुद्धा मित्रांच्या गल्लीत दोन वार जागा नाहीय...)

तलवारबाजी आणि घोडेस्वारीमध्ये अतिशय निपुण असलेल्या बहादूर शाह जफर बादशाह असून सुद्धा सुफी प्रवृत्तीचे होते. शायरीतील त्यांचे उस्ताद जौक देहलवी होते. गालिब ,मोमीन यासारख्या शायरांच्या सहवासात रमलेला असे. बादशाह अकबर सानी आणि त्यांची हिंदू राजपूत  बेगम लालबाई हे त्यांचे आई वडील. बापाने धाकटा भाऊ जहांगीर याला युवराज म्हणून घोषित केले .पण जहांगीर पूर्णपणे व्यसनी झाला आणि अकाली निधन पावला. त्यावेळी ब्रिटिश राजवट स्थिरावलेली होती. त्यांनी ३० डिसेंबर १८३७ रोजी बापाच्या मृत्यूनंतर जफरला दिल्लीच्या तख्तावर बसवले. आणि त्याला तू केवळ नाममात्र नामधारी बादशाह आहेस सत्ता मात्र आमचीच राहील असे बजावले होते. दिल्लीचे तख्त अतिशय मर्यादित झालेले होते. त्याला मुलांचे अकाली मृत्यू पहावे लागले.

इंग्रजी आक्रमणाने दिल्ली आणि परिसराची झालेली हानी त्याने आपल्या गझलेत मांडली आहे.

क्या खुशी हर एकको थी कर रहे थे सब दुवा
 जब घुसी फौजे नसारा हर असर जाता रहा....

(या ठिकाणी प्रत्येक जण सुखा समाधानात होता. चांगल्या दिवसाबद्दल प्रत्येक जण करुणा भाकत होता. पण इंग्रज फौजा  या ठिकाणी घुसल्या आणि सगळ्या आनंदावर विरजण. पडले .)

शाम को गुंचां खिला था चौक के बाजार में
 अब वहापर या खुदा, लाखोंका सर जाता रहा...

(हा चांदणी चौक सुंदर फुलांनी उमललेला ,सजलेला असायचा. पण आता त्या ठिकाणी लाखो लोकांची लोकांची डोकी छाटली जात आहेत .)

आगुं था ये शहर देहली अब हुआ उजडा दयार
क्यों  जफ्र ये क्या हुआ ? जोबन किधर जाता रहा...

(हे दिल्ली शहर एकेकाळी किती पुढारलेलं होतं ? आता अगदी त्याच
स्मशान झाल आहे. अरे जफर हे कसं घडल ? तुझे तारुण्यातले सुखाचे दिवस कुठे गायब झालेत?)

एकीकडे अनेक सरदार ,नबाब ,अमिर उमराव इंग्रजी सत्तेशी जुळवून घेत असताना बहादूर शाह जफरने मात्र १९५७ च्या उठावात बंडखोर सैनिकांचे नेतृत्व स्वीकारले आणि इंग्रजांशी उघड युद्ध पुकारले. झाशीची राणी लक्ष्मीबाई ,सेनापती तात्या टोपे आदी सर्वांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले.पुढे दगलबाजीने त्याला इंग्रजांचा कैदी बनवले. त्याच्या दोन मुलांना ठार मारण्यात आले. त्यांची धडा वेगळी मस्तके त्याला फराळा समवेत भेट म्हणून पाठवण्यात आली. ११ ऑक्टोबर १८५९ रोजी त्याला ब्रह्मदेशात रंगून येथे नेण्यात आले व नजरकैदेत ठेवले. जीवनात अतिशय त्रास भोगलेल्या  आणि एकाकीपण वात्याला आलेल्या बहादूर शहा जफर यांच्या गझला रसिकांना अंतर्मुख  व्हायला लावतात. एका गझलेत ते म्हणतात,

न किसी की आंख का नूर हुं ,ना किसी के दिल का करार हुं
जो किसी के काम न आ सके मै वो एक मुश्त गुबार हुं ...

(मी कुणाच्या डोळ्यांना शांतवणारा प्रकाश नाही.आणि कोणत्या काळजाची गुंतागुंत सोडवून त्यांला विसावाही देऊ शकत नाही. कोणाच्याही कसल्याही उपयोगाला न येणारी एक मूठभर माती म्हणजे मी .एवढीच आता ओळख राहिली आहे.)

न तो मै किसीका हबीब हू ,ना तो मै किसीका रकीब हू 
जो बिगड गया वो नसीब हू जो उजड गया वो दयार हुं...

(मी आता कोणाचा मित्र राहिलो नाही आणि कोणाचा शत्रूही राहिलेलो नाही. सटवीने एखाद्याच्या कपाळावर ' फुटकं नशीब 'म्हणून अधोरेखित करावं तो एक जीवनाचा वैराण वाळवंट बनलेला म्हणजे मी. तेच माझा जग आहे.)

प ए फातेहा कोई आये क्यूँ,कोई चार फुल चढाए क्यूँ,
कोई शमऊ ला के जलाये क्यूँ,, मै वो बेकसिका मजार हुं..

(मी गेल्यावर माझ्या कबरीजवळ कशाला कोण प्रार्थना करेल? कशाला कोण आग्रहाने फुले वाहील ?किंवा एखादा दिवा तरी कोण कशाला लावली ?एक पूर्णतः वाळीत टाकलेलं उपेक्षित थडगं म्हणजे मी )
पण भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम रंगूनला गेले होते त्यावेळी त्यांनी बादशहा जफरच्या कबरीला भेट देऊन तिथे फुले वाहून त्यांना आदरांजली वाहिली होती. 

मैं नही हू नग्मा ए या जांफीजां मुझे सुनके कोई करेगा क्या
मैं बडे बिरोग की हुं सदा किसी दिल जले की पुकार हुं...

(मी काही एखादे स्फूर्तीदायक आनंद गीत नाही . माझं रडगाणं ऐकून कोणाला उपयोग होणार नाही. मी म्हणजे एक मूर्तीमंत वैराग्याचा आवाज आहे. आणि एखाद्या जळलेल्या हृदयाची आर्त साद आहे.)


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)—————————————-

Post a Comment

Previous Post Next Post