प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२२: 'बालसाहित्य लिहिणे ही अभिमानाची गोष्ट आहे.कारण मुलांना वैश्विक भान देण्याचे काम बाल साहित्य करत असते. नामदेव माळी यांची कादंबरी ते काम प्रभावीपणे करते. अर्पणपत्रिके पासून समारोपापर्यंत एक प्रगल्भ विचार त्यातून पुढे येतो 'असे प्रतिपादन' किशोर ' मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी केले.ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा(कोल्हापूर ) आणि समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नामदेव माळी यांच्या' एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य' या कादंबरीवरील आयोजित केलेल्या चर्चासत्रात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
किरण केंद्रे म्हणाले, " बालसाहित्य लिहिणे हे मोठी जोखीम आणि गंभीर गोष्ट आहे. ज्यांचे मन शुद्ध आहे आणि मुलांबद्दल आस्था आहे त्यांनी बालसाहित्य लिहावे ".
यावेळी चर्चासत्रात सहभागी असलेले डॉ.रफीक सुरज म्हणाले," नामदेव माळी यांची' एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य' ही कादंबरी ग्रामीण आणि शहरी यामधील सुप्त संघर्ष यावर बोट ठेवते आणि सगळ्यांनाच विचार करायला प्रवृत्त करते. त्यामुळे बालसाहित्य हे वय सापेक्ष नाही तर जाणीव सापेक्ष आहे याची प्रचिती या कादंबरीतून येते. तर नीलम माणगावे म्हणाल्या, " अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मोल या बालकुमार कादंबरीतून नेमकेपणाने येते. लहान मुलांच्या कल्पना त्यांची समज याबद्दल अत्यंत आत्मीयतेने या कादंबरीचे लिखाण झालेले आहे."
प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत दमसाचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू यांनी केले. आभार समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी मानले. वैभवी आढाव यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमासाठी साधनाचे संपादक विनोद शिरसाट, विनय हर्डीकर, दमसाचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राजेंद्र मुठाणे, अन्वर पटेल, प्रा. सौरभ पाटणकर, प्रा. राज पटेल ,पांडुरंग पिसे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Tags
इचलकरंजी