प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
शर्करायुक्त धान्य, फळ किंवा फुले यांच्यामध्ये असलेल्या शर्करेचे रूपांतर ईथाईल अल्कोहोलमध्ये करून त्यापासून तयार झालेले मादक पेय म्हणजे दारू, जगभरामध्ये दारूचे असे अनेक प्रकार पाहावयास मिळतात; पण चक्क सापासूनही वाईन तयार होते, हे ऐकल्यानंतर न पिताच 'झिंग' आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.साधारणपणे वाईन ही द्राक्षांपासून तयार करता येते, हे आतापर्यंत माहीत आहे; पण सापांपासूनही अशी काही दारू निर्मिती होते, हे ऐकून कानच टवकारतात. या दारूचा आस्वाद प्रामुख्याने चीन, जपान आणि थायलंड या देशांमध्ये घेतला जातो.
मुळातच हे देश त्यांच्या आगळ्यावेगळ्या खाद्यसंस्कृतीसाठी जगभरामध्ये परिचित आहेत. नॉनव्हेजमध्ये या देशांमधील चॉईस पाहून थक्क वाटते. कुत्रा, मांजर, साप, विंचू यांच्यासह अनेक खतरनाक प्राणी,पक्षी यांचे मांस भक्षण करणाऱ्या खवय्यांची या ठिकाणी प्रचंड मोठी संख्या आहे. यामध्ये आता सापापासून दारू पिणाऱ्यांची भर पडल्याने संपूर्ण जगाच्या भुवया आणखीनच उंचावल्या तर नवल नाही.
ही दारू अगदी औषध घेतल्यासारखी घेतली जाते, याचे कारण म्हणजे यापासून अनेक आरोग्यविषयक समस्या दूर होतात, असे या देशामधील लोकांचे मत आहे. ही बनवताना अनेक प्रकारे जरी तयार केली जात असली तरी सापांना दारूने भरलेल्या जारमध्ये पॅकबंद अवस्थेमध्ये ठेवले जाते.
जोपर्यंत हे साप त्या दारूमध्ये सडत किंवा कुजत नाहीत, तोपर्यंत या जारचे झाकण उघडले जात नाही. जिवंत साप ज्यावेळी या दारूने भरलेल्या जारमध्ये बंदिस्त केला जातो, त्यावेळी तो साप ही दारू पिऊन उलटी करतात आणि काही कालांतराने ही उलटी त्या दारूमध्ये मिसळली गेल्याने सापाचा मृत्यू होतो. यानंतर या दारूमध्ये साप सडत गेल्याने त्याचे विषही नष्ट होते, असे येथील मद्यशौकिनांचे मत आहे.