दि. 03 ऑक्टोंबर 202
प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
कोल्हापूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महावितरणच्या परिते उपविभागातील शाखा कार्यालयांतर्गत "एक गाव एक दिवस" हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात हणबरवाडी, निगवे, हळदी, भाटणवाडी, माळ्याची शिरोली, राशिवडे बुद्रुक व घोटवडे या गावांतील विद्युत यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्ती व परिसर साफसफाईचे काम करण्यात आले.
'एक गाव-एक दिवस' उपक्रमात सबंधित गावातील लघुदाब विद्युत वाहिनीवरील झाडांच्या फांद्या तोडणे, ट्रान्सफॉर्मर भोवतालचा परिसर स्वच्छ करणे, विद्युत वाहिनीचे गार्डिंग जोडणे, स्पेसर्स बसविणे, झोळ पडलेल्या वीज वाहिन्या ओढून घेणे, वाकलेले वीज खांब पूर्ववत करणे, रोहित्र पेटीतील न्यूट्रल अर्थिंग करणे, रोहित्र पेट्या सुरक्षित अंतरावर बसविणे, ग्राहकांत विद्युत सुरक्षा विषयी जागृती करणे इ. कामे करण्यात आली. शाखा अभियंता श्री. सुभाष पाटील (इस्पुर्ली), श्री. पृथ्वीराज घोडके (बाचणी), श्री. प्रमोद पाटील (कोथळी),श्री.अमित नकाते (राशिवडे व परिते), श्री. अमित कुदळे (हसुर) व श्री. अनमोल बावडेकर ( माळ्याची शिरोली) यांच्यासह जनमित्रांनी कामकाज केले. सहाय्यक अभियंता श्री. अण्णासो आंबवडे यांनी कामाची पाहणी केली.
कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. परेश भागवत यांनी परिते उपविभागाचे कौतुक केले आहे. कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. अंकुर कावळे व कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता श्री. दीपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता श्री. रत्नाकर मोहिते व सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीपणे राबविली.-