प्राचार्य डॉ. आय . एच.पठाण यांचे प्रतिपादन
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : ,विशाल सामाजिक सर्वसमावेशक दृष्टिकोन ,मानवतावादी वृत्तीने लोककल्याणकारी प्रशासनाद्वारे सत्ता प्रस्थापित करण्याची ऊर्मी आणि प्रशासनामध्ये सामील करून घेताना पराक्रम आणि निष्ठा या गुणांना प्राधान्य अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला पुरोगामी स्वरूप प्राप्त झाले .आणि हा विचार केवळ स्थानिक न राहता अखिल भारतीय, वैश्विक पातळीवर पोहोचला. शिवरायांची उक्ती,कृती आणि कर्तुत्व सर्वकालिक श्रेष्ठ आहे ,असे मत इतिहासाचे गाढे अभ्यासक व लेखक प्राचार्य डॉ. आय. एच. पठाण यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि वाचन प्रेरणा दिन याचे औचित्य साधून ' शिवरायांच्या विचारांची प्रासंगिकता 'या विषयावर बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिरपूरकर प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील , रवींद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. शशांक बावचकर यांनी पाहुण्यांचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी जयकुमार कोले,धोंडीलाल शिरगावे,प्रा. अशोक कांबळे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते ' प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाच्या ऑक्टोबर अंकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
प्राचार्य डॉ.आय. एच.पठाण म्हणाले, शिवरायांना सर्वधर्मसमभावाचा वारसा आपल्या पूर्वजांकडून मिळाला होता. आदर्श राज्यकर्ते म्हणून आवश्यक असणारी सर्वगुणसंपन्नता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भरलेली होती. राजकारणापासून धर्मापर्यंतचे त्यांचे धोरण, विचार आणि आचार हे आजही व्यक्ती ,समाज ,संस्था आणि शासन या सर्व स्तरावर अनुकरणीय आहेत. शिवरायांचे कार्यकर्तृत्व व नैतिक अधिष्ठान भारतीय स्वातंत्र्य लढ्यालाही बळ देणारे ठरले. शिवरायांची समाज सुधारण्याची दृष्टी व्यापक होती. ध्येय आणि सुरक्षिततेला प्राधान्य, विज्ञानवादी भूमिका ,अस्पृश्यता व जातीभेदाला क्रियाशील विरोध ,सती प्रथेला विरोध, पारंपारिक विशेषअधिकाराला विरोध, प्रभावी नियोजन सतर्कता आणि पराक्रमावर विश्वास यावर त्यांचा भर होता. प्राचार्य डॉ. पठाण यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये अनेक उदाहरणे देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणवैशिष्ट्यांचा आणि त्याच्या प्रासंगिक उपयोगितेचा सविस्तर आढावा घेतला.
समारोप करताना प्राचार्य डॉ.टी. एस.पाटील म्हणाले, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा मुलाधार सामाजिक सलोख्याची प्रस्थापना करणे हा होता. महाराज धार्मिक वृत्तीचे असले तरी धर्मांध आणि धर्मवेडे नव्हते. त्यांनी आपल्या राज्यकारभारातून दिलेला संदेश अतिशय मौलिक स्वरूपाचा आहे. त्याचा अंगीकार राज्यकर्त्यांनी करण्याची नितांत गरज आहे. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानास इचलकरंजी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ,जिज्ञासू उपस्थित होते.