प्रेस मीडिया लाईव्ह :
गेली तीन दशके महिलांच्या हक्काबरोबरच लोकशाही आणि फाशीच्या शिक्षेविरोधात संघर्ष करणाऱ्या आणि सध्याही कारागृहात असणाऱ्या इराण मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यावर्षीचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ' सरकार जितके आम्हाला कैदेत ठेवेल तितक्या आम्ही सक्षम होत जाऊ 'अशी ठाम भूमिका घेऊन इराण मधील महिलांच्या शोषणाविरुद्ध लढा देत त्यांनी थेट राज्यसत्ते पुढे आव्हान निर्माण केलेले आहे.५१ वर्षाच्या नर्गिस या वर्तमान जगातील एक महत्त्वाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. गिर्यारोहणाची आवड असलेल्या ,भौतिकशास्त्र पदवी घेतलेल्या आणि अभियंता म्हणून काही काळ काम केलेल्या नर्गिस या पत्रकार व लेखिका म्हणूनही नामवंत आहेत. सामाजिक आणि धार्मिक दडपशाहीच्या आणि जुलमाच्या विरोधात त्या सातत्याने आवाज काढत असतात. त्यामुळे त्यांना वारंवार तुरुंगवास होतो भोगाव लागतो.इराण मधील शिक्षेनुसार त्यांना सार्वजनिकरित्या दीडशेवर चाबकाचे फटकारेही मारण्यात आले.
गेल्या आठ-दहा वर्षात आंदोलन व तुरुंगवासामुळे त्या आपल्या पती आणि दोन जुळ्या मुलीनाही भेटू शकलेल्या नाहीत. २००३ सालचा शांततेचा नोबल पुरस्कार इराणमधीलच मानवाधिकार कार्यकर्त्यांची शिरीन इबादी यांना मिळाला होता.नर्गीस त्यांच्याच चेल्या आहेत. सध्या जगभरच सामाजिक आणि धार्मिक उन्मादाचे वातावरण तयार केले जात आहे. जगातील अनेक राज्यकर्त्यांचा वर्तनव्यवहारही तसाच दिसतो आहे. युद्धवर भडकवला जातो आहे. सध्या पश्चिम आशियात हमास आणि दक्षिण इस्त्राईल यांच्यातील हल्ला व प्रतीहल्ला याची जी छायाचित्रे व व्हिडिओ येत आहेत त्यामध्येही महिलांना लक्ष केल्याचे ठळकपणे दिसून येते. धर्मांधता की माणुसकी, युद्ध की शांतता यामध्ये नेहमीच माणुसकी आणि शांततेचे महत्व फार मोठे आहे. हिंसेतून हिंसाच जन्म घेत असते.म्हणूनच शांततेच्या मार्गाने सविनय कायदेभंगाचा लढा देणाऱ्या नर्गिस मोहम्मदी यांची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी आलेल्या साडेतीनशेवर मानांकनातून निवड होणे ही मानवाधिकारासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला बळ देणारी घटना आहे. या पुरस्कारामुळे नर्गिस यांच्या लढ्याचा गौरव करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे नोबेल समितीनेही म्हटले आहे.
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com