जिल्हा परिषद शाळांमधील १०००० शिक्षक होणार अतिरिक्त ? कमी पटसंख्येच्या शाळांवरील शिक्षकांना 'समूह शाळा पॅटर्न'ची धास्त



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

 राज्यातील जिल्हा परिषदांच्या १४ हजार ७८३ शाळांची पटसंख्या चिंताजनक आहे. १ ते २० पटसंख्येच्या त्या शाळांवर तब्बल २९ हजार ७०७ शिक्षक कार्यरत आहेत. दुसरीकडे शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जवळपास २० हजार शिक्षकांची भरती केली जात आहे.वास्तविक पाहता झेडपीच्या शाळांमध्ये तेवढ्या जागा रिक्त नसल्याने समूह शाळांवरील अंदाजे १० हजार शिक्षक अतिरिक्त होतील, अशी चिंताजनक सद्य:स्थिती आहे.

'आरटीई'तील निकषांनुसार इयत्ता सातवीपर्यंत ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे समिकरण आहे. मात्र, राज्यातील सतराशे जिल्हा परिषद शाळांमध्ये तीन विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक तर तीन हजार १३७ शाळांमध्ये आठ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, अशी वस्तुस्थिती आहे.

दुसरीकडे नऊ हजार ९१२ शाळांमध्ये १५ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे एकूण २९ हजार ७०७ शिक्षक कमी पटसंख्येच्या शाळांवर कार्यरत आहेत. पहिली ते चौथी तर काही ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून त्याठिकाणी सरासरी दोन शिक्षक आहेतच. मात्र, ज्या शाळांमध्ये पटसंख्या मोठी आहे, त्याठिकाणी ३८ ते ४२ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असा विरोधाभास आहे.

या पार्श्वभूमीवर आता राज्यात 'पानशेत मध्यवर्ती शाळा' पॅटर्न राबविला जाणार असून त्यातून शासनाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. दुसरीकडे त्यातून सर्व शाळांना विद्यार्थी संख्येच्या तुलनेत पुरेसे शिक्षकही मिळणार आहेत. मात्र, या पॅटर्नमुळे अनेकजण अतिरिक्त होतील असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सध्याची भरती शेवटची, यापुढे कंत्राटी शिक्षक?

शालेय शिक्षण विभागातर्फे सध्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधील अंदाजे २० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत १.५४ लाख उमेदवारांनी 'पवित्र'वर नोंदणी केली आहे. जवळपास १५ जिल्ह्यांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. समूह शाळा पॅटर्न आणि सध्याची मेगाभरती, यामुळे आता भविष्यात अशाप्रकारे शिक्षक भरती होईल, याची शक्यता धूसर मानली जात आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार यापुढे कंत्राटी शिक्षकांचीच भरती होईल, अशीही चर्चा आहे.

झेडपीच्या शाळा अन्‌ शिक्षक

एकूण शाळा. ६३,०००

शिक्षकांची रिक्तपदे  ३४,०००

कमी पटाच्या शाळांवरील शिक्षक २९,७०७

अंदाजे शिक्षक भरती २०,०००

Post a Comment

Previous Post Next Post