प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगड जिमाका :- मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील ईरशाळवाडी येथे भूस्खलन होवून दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशीच्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपये व राज्य आपत्ती सहायता निधीतून 4 लाख रुपये असे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
मंत्री श्री.पाटील म्हणाले की, संबधित प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य पार पडल्यानंतर प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी 228 व्यक्ती वास्तव्यास होत्या. त्यापैकी 144 व्यक्ती हयात आहेत. 27 मृतदेह सापडले असून 57 व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रत्यक्ष दुर्घटनाग्रस्त ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन 23 जुलै 2023 रोजी सायंकाळी बचाव व शोधकार्य थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
दुर्घटनेतील मृतदेह आढळून आलेल्या 27 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच 20 व्यक्तींच्या वारसांना 1 लाख रुपये इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटप करण्यात आलेले आहे. यामधील 7 मयत व्यक्ती आणि 57 बेपत्ता व्यक्तींना प्रशासनाने स्थानिक चौकशी करून अनुदान वाटप करण्याची मागणी मंजूर झाली असून या दुर्घटनेतील मयत व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येणार आहे. हा निधी तत्काळ वितरित करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.