प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे- 35 व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘स्वरांजली’ या कार्यक्रमात प्रख्यात गायक रविराज नासेरी यांनी सादर केलेल्या हिन्दी भजन आणि मराठी अभंगांनी बालगंधर्व रंगमंदिराचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले तर त्यांनीच गायलेल्या गझल, सूफी गाणी आणि जुन्या हिन्दी गाण्यांनी रसिकांना तृप्त केले.
प्रख्यात साई भजन गायक रविराज नासेरी यांनी 1988 पासून विदेशात 22 देशांमध्ये कार्यक्रम केले आहेत. 2015 साली त्यांनी सलग 130 कार्यक्रम केले आहेत. त्यानंतर 2019 मध्ये 80 तर 2022 मध्ये 40 कार्यक्रम केले आहे. हिन्दी भजन, मराठी अभंग, सूफी गाणी, हिन्दी गाणी, मराठी गाणी यांच्या मिलाफ हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य आहे.
त्यांनी ‘जय गणपती वंदन गणनायक..’ या गणपती भजनाने त्यांच्या गायनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘प्रभुजी तुम चंदन, हम पानी’, ‘तेरे मन मे राम’ अशा प्रकारची हिन्दी भजने सादर केली. तर स्व. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले ‘आरंभी वंदीतो.. आयोध्येचा राजा, विठ्ठल किती गावा.. विठ्ठल किती घ्यावा, विठ्ठल आवडी प्रेमभावो..विठ्ठल नामाचा रे टाहो असे अभंग सादर केले. त्यांनी गायलेली भजने आणि अभंगांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आणि रसिकही तृप्त झाले. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.
रविराज नासेरी यांनी त्यानंतर ‘दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे,,,’, ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुं दे रे..’, अशी अरुण दाते आणि सुधीर फडके यांची विविध मराठी गीतांची पेशकश केली. मराठी गाण्यांनंतर त्यांनी महम्मद रफी यांनी गायलेली ‘चाहूँगा मैं तुझे साँझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे, आवाज़ मैं न दूंगा.., तर ‘पत्थर के सनम तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना..’, अशी एकाचढ एक हिन्दी गाणे सादर केली. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर त्यांनी ‘किन्ना सोणा तैनू रब ने बनाया..’, ‘सानु इक पल चैन ना आवे..’, ‘तू माने या ना माने दिलदारा..’ अशा प्रकारची सूफी गीते सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
रविराज नासेरी यांनी गायलेल्या ‘हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही.., चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते..मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,’ .. या कवी सुरेश भट यांच्या मराठी गझलांनी रसिकांचे कान तृप्त केले.
रविराज नासेरी यांना हर्ष नासेरी यांनी ताल लावण्यासाठी, ताहिर हुसेन यांनी तबल्याची, धर्मवीर यांनी ढोलकची, गिटार ऋषि सिंग यांनी तर सुब्रतो दा यांनी कीबोर्डवर साथसंगत केली.
पुणे फेस्टिवलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, राजाभाऊ साठे आणि सचिन साळुंके यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कमिटी प्रमुख अतुल गोंजारी, मोहन टिल्लू आणि श्रीकांत कांबळे उपस्थितीत होते.
३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमाशिल्प आणि नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारतफोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.