पुणे नवरात्रौ महोत्सव व राजीव गांधी ईलर्निंग स्कूलचा उपक्रम
आजीआजोबा नातवंड म्हणजे घरातील जुन्या नव्याचा संगम - डॉ. कुमार सप्तर्षी
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे - आजी आजोबांचा त्यांच्या आय़ुष्यातील शेवटचा मित्र म्हणजे त्यांच नातवंड. नातवंडच्या आयुष्यातील त्याचे पहिले मित्र म्हणजे आजी आजोबा असतात याचं कारण म्हणजे दोघांकडेही असलेला वेळ. लहान मुलांना भिती कशाची वाटत असेल तर ती अनोळखीपणाची. या अनोळखी गोष्टींची ओळख करून देणारे आजीआजोबा असतात. जशा नद्या संगमाच्या ठिकाणी एकमेकांत मिसळतात, त्यांचे पाणी ओळखू येत नाही तसेच आजी आजोबा नातवंड एकमेकांच्या सहवासात मिसळून जातात. त्यामुळे आजीआजोबा नातवंड हा घरातील नव्या जुन्याचा संगम आहे अशा शब्दात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी भावना व्यक्त केल्या.
निमित्त होते ते जागतिक आजी आजोबा दिनाचे......पुणे नवरात्रौ महोत्सव व राजीव गांधी ई लर्निंग स्कूल यांनी जागतिक आजी आजोबा दिनाच्या पूर्व संध्येला डॉ. कुमार सप्तर्षी व उर्मिला सप्तर्षी, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत हरिभक्त परायण उल्हासदादा पवार व अनुराधाताई पवार, डॉ. वीणा देव आणि कवयत्री डॉ. संगीता बर्वे व राजीव बर्वे यांचा “आदर्श आजी आजोबा पुरस्कार” देऊन पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागूल यांनी सत्कार केला. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंत, कोषाध्यक्ष व श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष नंकदुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, राजीव गांधी ईलर्निंग स्कूलचे प्राचार्य जांबुवंत मसलकर आणि पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सांस्कृतिक प्रमुख संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मान चिन्हं, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आबा बागूल यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राजीव गांधी ईलर्निंग स्कूलचे सुमारे चारशे विद्यार्थी आयआयटीत शिकत किंवा शिकलेले आहेत. आयएएस - आयपीएस होत आहेत. दोन विद्यार्थी नासा संसोधन संस्थेत कार्यरत आहेत. हे सर्व विद्यार्थी गरीब कुटुंबातील किंवा घरात कोणतिही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांकडे बघितल्यावर त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर ते चांगले नागरीक होऊ शकतात हा आत्मविश्वास मिळाला. त्यातून सध्या समाजातील एकंदर वातावरण बघून आम्ही दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी “हरवलेले संस्कार” अशी मालिका गेल्या महिन्यापासून सुरू केली आहे. याचे पहिले पुष्प प्रा. न. म. जोशी यांनी गुंफले. हा दुसरा कार्यक्रम जागतिक आजी आजोबा दिनाच्या पूर्व संध्येला होत आहे. आजी आजोबा ही घरातील संस्काराची केंद्र होती. आज संस्कार घरातच हरवले असल्याने मुलांवर बाहेरच संस्कार जास्त होऊन त्यातून नवे नवे प्रश्न तयार होत आहेत. आजी आजोबा या कुटुंबातील दोन्ही संस्थांना योग्य सन्मान मिळणे किती आवश्यक आहे हे समजावण्यासाठी आदर्श आजी आजोबा पुरस्कार वितरण सोहळा आहे. तसेच या दिवसाचे औचित्य साधून या महिन्यापासून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आजी आजोबांनी आणि ते नसतील तर त्यांच्या पालकांनी शाळेत मुलांना सोडायला येणे बंधनकारक करत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी पुण्यात नुकत्याच घडलेल्या घटनांचे दाखलेही दिले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. सप्तर्षी पुढे म्हणाले, नातवंडांच्यातील असुरक्षिततेची भावना आजी आजोबाच नष्ट करतात. लहान मुलांना सतत अनेक प्रश्न पडत असतात, त्याची उत्तरेही आजी आजोबांनी देणे आज आवश्यक झाले आहे. तशी तयारी आजी आजोबांनीही केली पाहिजे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जिथे अक्कल नसते तिथे नक्कल चालते. नातवंडांना वयोमानाने अक्कल नसल्याने ते आजी आजोबांचीच नक्कल करत असतात. त्यामुळे आजी आजोबांनीही त्यांच्याशी वागताना जपून वागणे किंवा कृती केली पाहिजे. आईवडीलही आपले मूल चांगले व्हावे यासाठी नवे नव शिकवत असतात. त्याचवेळी आजी आजोबांनी त्याला विरोध करण्याऐवजी नातवंडाला चांगले बोलायला, वागायला शिकवले पाहिजे. काय चांगले काय वाईट हे ओळखायला शिकवले पाहिजे.
डॉ. संगीता बर्वे यांनी त्यांच्या ‘झाड आजोबा’ ही त्यांची कविता म्हटली प्रक्षागृहातील सर्वांकडून म्हणून घेतली. त्या म्हणाल्या, आजी आजोबांनी नातवंड शाळा कॉलेज मधून घरी आले की ते आज काय शिकले हे विचारले पाहिजे आणि आपणही ते शिकले पाहिजे. यातूनच आपापसातील नातं घट्ट होत जातं. नवे शिकण्यासाठी आज आजी आजोबांसाठीही एखादी शाळा असली पाहिजे असे त्यांनी नमूद केले. डॉ. वीणा देव म्हणाल्या, आज तंत्रज्ञानाचे युग आहे. नविन तंत्रज्ञान शिकवण्याठी आजी आजोबांनी आपल्या नातवंडाना गुरू केले पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे आजी आजोबांनी तडजोड करायला शिकलं पाहिजे.
उल्हासदादा पवार म्हणाले, या कार्यक्रमाला येऊन मला माझ्या आजी आजोबांची आठवण झाली. आम्ही लहान असताना “चिमणी पाखरं” आणि “बाळा जो जो रे” हे चित्रपट संस्कारक्षम होते म्हणून घरातील सर्व मुलांना बघायला नेले होते. घरातील संस्कार आज कुठेतरी हरवल्यासारखे दिसतात. ते संस्कार आबा बागूल यांनी सांगितल्याप्रमाणे कुठे बाजारात विकत मिळत नाहीत त्यामुळे आणून देता येत नाहीत. ते घरातच होत असतात. आजी आजोबाच नाहीतर आई वडील, भावंड सर्वांच्या वागण्याबोलण्यातून न कळत संस्कार लहान मुलांवर होत असतात.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व स्वागत गीताने झाली. त्यानंतर राजीव गांधी ईलर्निंग स्कूलमधील मुलांनी आजी आजोबांचे महत्व सांगणारे प्रहसन व कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन घनशाम सावंत यांनी केले तर आभार प्राचार्य जांबुवंत मसलकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आजी आजोबा, पालक मुलांसमावेत आलेले होते.