मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

मतदान केंद्र सुसूत्रीकरण उपक्रमात सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मतदान केंद्र सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी, दावे हरकती दाखल करण्याच्या तारखांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कळविले आहे.

मतदान केंद्र सुसूत्रीकरण उपक्रम

मतदान केंद्रांची प्रारुप यादी २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली असून सदर यादीवर दावे, हरकती किंवा सूचना द्यायच्या असतील तर नागरिक २ ऑक्टोबर २०२३ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात देऊ शकतील. सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्रांच्या यादीस मान्यता घेणे हा उपक्रम सध्या सुरु असून त्यासाठी ९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपल्या मार्गदर्शक सूचना मांडाव्यात व राष्ट्रीय कार्यक्रमास  सहकार्य करुन मतदारांना त्याचा लाभ होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी २७ ऑक्टोबर रोजी

सुधारित करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दावे व हरकती २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबरपर्यंत दाखल करता येतील. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार आहे.

सेवादलातील मतदार यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

तसेच १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीच्या शेवटच्या भागात म्हणजेच सेवादलातील मतदार यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमही प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार शेवटच्या भागाची प्रारुप मतदार यादी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित रेकॉर्ड अधिकारी/ कमांडिंग अधिकारी वा प्राधिकाऱ्याकडून १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी कळविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post