प्रेस मीडिया लाईव्ह :
३५ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संपन्न झालेल्या मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत २९ ते ४० वर्षे वयोगटात मधुरा वाघ व ४१ ते ५१ वर्षे वयोगटात सीमा शर्मा या मिसेस पुणे फेस्टिव्हलच्या मानकरी ठरल्या. तसेच, २९ ते ४० वर्षे वयोगटात मधुरा बुटाला आणि घनाक्षी लोंढे आणि ४१ ते ५१ वर्षे वयोगटात रोहिणी टिळक आणि सारिका गांधी या रनरअप ठरल्या. मिसेस पुणे फेस्टिव्हल ही विवाहित महिलांची सौंदर्य,व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर येथे आज पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे,संयोजिका अॅड अमृता जगधने,परीक्षक नृत्य दिग्दर्शक ओंकार शिंदे, प्रचिती पुंडे, रविबाला काकतकर आणि सारिका शेठ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ग्रुमिंग मेंटोर जुई सुहास यांनी विजेत्या महिलांना मुगुट प्रदान केले. याप्रसंगी मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, पदाधिकारी अतुल गोंजारी, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रतीक कदम यांनी केले. या कार्यक्रमास महिलांनी मोठी गर्दी केली होती.
या स्पर्धेत २९ ते ४० व ४१ ते ५१ वर्ष असे दोन वयोगट होते. १४०हून अधिक विवाहित महिलांनी यात भाग घेतला होता. याची प्राथमिक निवड स्वपरिचय व प्रेझेंटेशनवरून केली व त्यातून अंतिम फेरीसाठी पहिल्या गटात १०व दुसऱ्या गटात १०अशा २०महिलांची निवड करण्यात आली. त्यांचे सलग तीन दिवस ग्रुमिंग केले गेले व त्यामध्ये टॅलेंट राऊंडही घेतले गेले.
आज स्पर्धेच्या दिवशी या निवड केलेल्या दोन्ही गटातील प्रत्येकी १० महिला स्वपरिचय व नंतरच्या फेरीत प्रश्न उत्तरे यांना सामोऱ्या गेल्या.यातून ६ महिलांची निवड करण्यात आली . यातून एक विजेती व दोन उपविजेत्या यांची निवड दोन्ही गटातून करण्यात आली. रविबाला काकतकर, प्रचिती पुंडे, ओंकार शिंदे आणि सारिका शेठ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमात गणेश वंदना कलाकृती डान्स अकादमी तर्फे करण्यात आली. याचे नृत्यदिग्दर्शन अदिती केळकर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुरज डान्स अकादमीने ‘बाई पण भारी देवा’ गाण्यावर नृत्य केले तर धनश्री जोगळेकर यांनी सरगम हे कथ्थक केले.
या स्पर्धेतील महिलांचे ग्रुमिंग ‘मिसेस महाराष्ट्र’ शुभांगी पाटील यांनी केले. या स्पर्धेचे संयोजन अॅड.अमृता जगधने यांच्या समवेत अर्चना सोनावणे व आशुतोष जगधने यांनी केले. या कार्यक्रमास मेकअपसाठी प्रायोजक वीएलसीसी व ब्लेझ अकॅडमी होते तर फोटोशूटसाठी प्राजक्ता जोगळेकर या होत्या.
३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर्स, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.