३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्यपाल मा. रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन

 

 प्रेस मीडिया लाईव्ह

 अन्वरअली शेख : 

पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वा. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. राज्याचे पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री ना. उदय सामंत हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच खा. रजनी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, खा. श्रीरंग बारणे, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी हे या प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी राज्यमंत्री श्री. रमेश बागवे आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणेच्या अध्यक्षा सौ. अबेदा इनामदार यावेळी उपस्थित होत्या.

     

  ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमामालिनी यांचा ‘गंगा’ बॅले, लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम म्युझिकल नाईट, ऑल इंडिया मुशायरा, जाणता राजा, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, महिला महोत्सव, केरळ महोत्सव, कीर्तन महोत्सव, मराठी कवी संमेलन, इंद्रधनु, कथ्थक, भरतनाट्यम, लावणी, विविध नृत्य अविष्कार, मराठी हिंदी गीते या बरोबरच पुणे गोल्फ कप टूर्नामेंट, बॉक्सिंग, कुस्ती व मल्लखांब अशा क्रीडास्पर्धाही यंदाच्या पुणे फेस्टीव्हलची वैशिष्ट्ये आहेत. 

          लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पोहोचवला. त्यावेळी त्यामध्ये कथाकथन, कीर्तन, पोवाडे, लोककला, मेळे असे कार्यक्रम होत असत. यापासूनच प्रेरणा घेऊन १९८९ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. सलग १० दिवस आणि ३५ वर्षे चालू असलेला पुणे फेस्टिव्हल देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. यापासून प्रेरणा घेऊन अनेक सांस्कृतिक महोत्सव सुरु झाले. त्यामुळेच पुणे फेस्टिव्हलला ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हलस’ म्हटले जाते. भारतरत्न पं. भीमसेन जोशी प्रथमपासून पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष होते. 

          ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पद्मश्री खा. हेमामालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन असून पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासून सलग ३५ वर्षे पुणे फेस्टिव्हलमध्ये त्या सक्रियपणे सहभागी होत असतात. स्वाईन फ्ल्यू (२००९) आणि कोरोना (२०२०, २०२१) अशी ३ वर्षे पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम झाले नाहीत. उर्वरित ३२ वर्षात नृत्यांगना हेमामालिनी यांनी तब्बल ३० वर्षे बॅले, गणेश वंदना अथवा शिवस्तुती पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर केली आहे. त्यांचा प्रत्येक पहिला बॅले त्या प्रथम पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर करतात. त्यांच्या कन्या ईशा आणि अहाना यांच्या पहिल्या स्टेज शोची सुरुवात त्यांनी पुणे फेस्टिव्हलपासूनच केली. पुणे फेस्टिव्हलमध्ये त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल यंदा उद्घाटन सोहळ्यात त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. 

            पुणे फेस्टीव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टीव्हलचे आयोजन केले जाते. पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात. 

            ३५व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना मंगळवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्या हस्ते विधीवत संपन्न होईल. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी याचे पौरोहित्य करतील. 

            ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, मायर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत. 

   विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नामवंताना पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा ज्येष्ठ अस्थीरोगतज्ञ पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांना या पुरस्काराने गौरविले जाईल. 

            सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील मंडळांचा पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव उर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'जय गणेश' पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदा ‘खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शुक्रवार पेठ’ आणि ‘श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट’, सोमवार पेठ, पुणे यांना या पुरस्काराने गौरविले जाईल. 

उद्घाटन सोहळा

दरवर्षीप्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळा देखील नेत्रदीपक असेल. ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. हिंदुस्तानी कर्नाटकी शास्त्रीय गायिका नंदिनी गुजर गणेशस्तुती सादर करतील. पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री व नृत्यांगना हेमामालिनी सहकलावंतांसह ‘गणेश वंदना’ सादर करतील. यानंतर नितीन महाजन यांच्या केशव शंखनाद पथकाचे ४० जणांचे पथक मंचावर एकत्रित शंखवादन करतील. महाराष्ट्र मंडळाच्या विविध वयोगटातील ४० मुले - मुली ‘कलात्मक योगासने’ची प्रात्याक्षिके सादर करणार असून त्यामध्ये पूर्ण उष्ट्रासन, पूर्ण वृश्चिक आसन, पूर्ण धनुरासन, गोखील आसन आणि डिंबासन याची प्रात्यक्षिके सादर केली जातील. याचे संयोजन महाराष्ट्र मंडळ योग वर्गाच्या पल्लवी कव्हाणे यांनी केले आहे. 

            रामायणातील सीतेचे अपहरण, रावणाचे क्रूर वर्तन, सीतेची पतीनिष्ठ आदींवर आधारित ‘सीता’ ही नृत्यनाटिका सादर होईल. यामध्ये अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर सीतेची भूमिका बजावतील व ओम डान्स अकादमीचे विद्यार्थी साथ देतील. याचे नृत्य दिग्दर्शन ओंकार शिंदे यांनी केले आहे. 

    विठ्ठल विठ्ठल नामघोष व टाळमृदुंगाच्या नादात विठ्ठलाचा जयघोष करीत नाचत गात जाणाऱ्या वारकऱ्यांचा ‘विठ्ठल विठ्ठल’ हा कार्यक्रम नृत्य दिग्दर्शिका वृंदा साठे सादर करतील. याची संकल्पना आणि संयोजन करूणा पाटील यांचे आहे. ६१ कलाकारांचा यात समावेश आहे. ‘कॅलिडोस्कोप - लावणी फ्युजन' या कार्यक्रमात अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, संस्कृती बालगुडे, अमृता धोंगडे, आयली घिया, ऋतुजा जुन्नरकर, भार्गवी चिरमुले आणि रुपाली भोसले यांचा समावेश असून पायलवृंद संस्थेच्या प्रमुख ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे यांनी याचे नृत्य दिग्दर्शन व संयोजन केले आहे. ‘सुरमणी’ सानिया पाटणकर या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची गीते सादर करणार असून प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनचे सहकलावंत त्यांना साथ देतील. 

            अभिनेत्री व नृत्यांगना हेमामालिनी यांच्यावर चित्रित केलेल्या चित्रपटातील गाण्यांवर आधारित ‘गोल्डन इरा ऑफ ड्रीम गर्ल’ हा नृत्य कार्यक्रम सादर होईल. त्यामध्ये अभिनेत्री उर्मिला कानेटकर, नुपूर दैठणकर, श्वेता शेवाळे, मयुरेश पेम यांच्यासह नृत्य तेज अकादमीचे सहकलावंत भाग घेतील. नृत्यतेज अकादमीच्या प्रमुख नृत्य दिग्दर्शिका तेजश्री अडीगे यांनी याची संकल्पना व संयोजन केले आहे. ‘हिस्टोरिकल एम्पायर्स ऑफ इंडिया’ या कार्यक्रमात पोनियन सेलवन, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, शेर शिवराज आणि मनीकर्णिका या ऐतिहासिक चित्रपटातील गाण्यांवर अभिनेत्री नृत्यांगना शर्वरी जेमिनीस, आशय कुलकर्णी आणि कुणाल फडके हे नृत्याविष्कार सादर करतील. याची संकल्पना आणि संयोजन स्वप्नील रास्ते यांनी केले आहे. 

ऑल इंडिया मुशायरा - या उद्घाटन सोहळ्यानंतर श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रात्री ८.३० वा. ऑल इंडिया मुशायरा सादर होईल. यामध्ये मंझर भूपाली (भोपाल), डॉ. लता हया (मुंबई), अंजुम बाराबंकी (लखनौ), आब्रार काशिफ (राजस्थान), सरदार सलीम (हैद्राबाद), सागर त्रिपाठी (बनारस), डॉ. कासीम इमाम (मुंबई), फरहान दिल (मालेगाव) हे देशातील नामवंत शायर सहभागी होत आहेत. शायरांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमाम कासीम (मुंबई) हे करणार असून संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इक्बाल अन्सारी (पुणे) करणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. पी ए इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी ए इनामदार आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आबेदा इनामदार करीत आहेत. 

‘गंगा बॅले’ - ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना हेमामालिनी यांनी पुणे फेस्टिवलमध्ये बॅले सादर करण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. या मंचावर बॅले, गणेश वंदना सादर करण्याचे त्यांचे यंदाचे ३० वे वर्ष आहे. शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी सायं. ७.३० वा. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे त्या 'गंगा' बॅले सहकलावंतांसह सादर करतील. गंगा नदीच्या प्रकटण्याची पौराणिक कथा मांडतानाच आजच्या घडीला गंगा नदीसह सर्वच नद्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेशही त्या या बॅलेतून देतील. याची संकल्पना, कथा, दिग्दर्शन व निर्मिती स्वतः हेमामालिनी यांनी केली आहे. याचे संगीत पद्मश्री रवींद्र जैन, अशीत देसाई, आलाप देसाई यांचे असून नृत्य दिग्दर्शन भूषण लकंद्री, वेशभूषा नीता लुल्ला, संशोधन राम गोविंद, संवाद व गीते रवींद्र जैन, शेखर अस्तित्व यांचे आहे. याचे गायक सुरेश वाडकर, कविता कृष्णमुर्ती, शंकर महादेवन, मिका सिंह, रेखा राव, हेमा देसाई आणि आलाप देसाई आहेत. 

सोनू निगम म्युझिकल नाईट - १० विविध भाषांमध्ये २००० हून अधिक गाणी गाणारे आणि तरुणांचे ‘आयडॉल’ बनलेले ज्येष्ठ पार्श्वगायक सोनू निगम यांची म्युझिकल नाईट हे यंदाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ७.३० वा सादर होणाऱ्या ‘सोनू निगम म्युझिकल नाईट’ मध्ये जुन्या व नव्या हिट गाण्यांची मेजवानीच रसिक प्रेक्षकांना मिळेल. 

जाणता राजा - पद्मविभूषण शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्यातील छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील शिवजन्म, राज्याभिषेक, अफझल खान स्वारी, लाल महाल छापा अशा विविध प्रसंगांवर आधारित ‘जाणता राजा’  हा  भव्य  कार्यक्रम  सोमवार दि.  २५  सप्टेंबर रोजी सायं ७.३० वा. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. भारतीय कला वैभव तर्फे सूत्रधार म्हणून मंदार परळीकर हा कार्यक्रम सादर करित असून त्यामध्ये संस्थेचे १५० कलावंत सहभागी होत आहेत. याचे दिग्दर्शक योगेश शिरोळे, साहित्य व कपडेपट आनंद जावडेकर  आणि  नेपथ्य  महेश  रांजणे  यांचे आहे. यातील विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेली गीते गायक फैय्याज आणि शंकर घाणेकर यांनी गायली आहेत. 

मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा - मिस पुणे फेस्टिव्हल २०२३ चा सिझन ९ वा यावर्षी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मंगळवार दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४.०० ते सायं. ७.०० यावेळेत संपन्न होत आहे. १८ ते २८ वर्षे वयोगटातील ३०० पैकी २० तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. या २० तरुणींचे मॉडेलिंगचे संपूर्ण प्रशिक्षण, अंतिम स्पर्धेसाठीची तयारी ग्रूमिंग तज्ञ जुई सुहास करून घेणार आहेत. फिटनेस चाचणी, दंतचिकित्सा, नृत्य सराव, फोटो शूट इत्यादी निरनिराळ्या चाचण्या स्पर्धकांना पार पाडाव्या लागणार आहेत. त्याप्रमाणेच अंडर वॉटर फोटोग्रॅफीचाही यामध्ये समावेश असेल. रेधून डान्स अकादमीचे आशुतोष राठोड स्पर्धकांच्या तसेच अंतिम फेरीतील नृत्यरचना सादर करणार आहेत. बेस्ट टॅलेंट, मिस फोटोजनिक, बेस्ट फिटनेस, बेस्ट हेअर, बेस्ट स्माइल असेही पुरस्कार दिले जातील. सुप्रिया ताम्हाणे यांनी याचे संयोजन केले आहे. 

क्रीडा स्पर्धा 

गोल्फ स्पर्धा  -  पुणे गोल्फ कप टूर्नामेंट शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वा. येरवडा गोल्फ क्लब येथे सुरु होत असून दुपारी १२ वा. बक्षीस वितरण समारंभ पार पडेल. यामध्ये हँडी कॅप प्रकारात गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ डिव्हिजन असे गट असून, यंदा १०० हून अधिक स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे संयोजन पुणे गोल्फ क्लबचे जयदीप पटवर्धन आणि प्रदीप दळवी यांनी केले आहे. 

बॉक्सिंग स्पर्धा  –  दरवर्षीप्रमाणे पुरुष आणि महिला बॉक्सिंग स्पर्धा शनिवार दि. २३ सप्टेंबर व रविवार दि. २४ सप्टेंबर या दोन दिवशी जनरल वैद्य स्टेडीअम, भवानी पेठ, पुणे येथे संपूर्ण दिवसभर चालू राहतील. यात एकूण ६० स्पर्धक असून विविध वजन गटातील कप क्लास कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनिअर युथ आणि इलाईट प्रकारात संपन्न होतील. या स्पर्धा जिल्हास्तरीय असून पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या आहेत. माजी राज्यमंत्री रमेश बागवे व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी याचे आयोजन केले आहे. 

मल्लखांब स्पर्धा - पुण्याच्या टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ येथे शनिवार दि. २३ सप्टेंबर व रविवार दि. २४ सप्टेंबर या दोन दिवशी पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या संयोजनाने विविध वयोगटातील मुले व मुली, स्पर्धकांसाठी पुरलेल्या मल्लखांबावर मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला असून विविध वयोगटातील पहिल्या ३ विजेत्यांना पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रीय मंडळाचे अभिजित भोसले व सचिन परदेशी यांनी याचे आयोजन केले आहे. 

कुस्ती स्पर्धा - कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत पुणे जिल्हा कुस्ती संघटनेच्या सहकार्याने विविध वयोगटातील पैलवानांसाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व पंकज हरपुडे यांनी केले आहे. पुणे फेस्टिव्हलचे प्रसन्न गोखले हे या क्रीडा समितीचे संयोजक आहेत. 

बालगंधर्व रंगमंदिर - बालगंधर्व रंगमंदिर येथे महिला महोत्सवातील मिसेस पुणे फेस्टिव्हल, महिलांच्या नृत्य स्पर्धा, ब्रायडल स्पर्धा, व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल स्पर्धा त्याचबरोबर कलादालनात महिलांचे पेंटिंग प्रदर्शन संपन्न होईल. याशिवाय इंद्रधनू, केरळ महोत्सव, कीर्तन महोत्सव, मराठी कवी संमेलन, भरतनाट्यम, कथ्थक, लावणी, आर. डी. बर्मन लाईव्ह ऑर्केस्ट्रा, अभंग गझल, सुफी संगीत, हिंदी - मराठी साँग्स् अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. श्री. अतुल गोंजारी व श्री. श्रीकांत कांबळे बालगंधर्व रंगमंदिर व कलादालनचे समन्वयक आहेत. 

पाककला स्पर्धा - श्री शिवाजी मेमोरियल इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मंगला टॉकीज जवळ, पुणे येथे सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. महिला कीर्तनकारांचा नारदीय कीर्तन महोत्सव श्री हरी कीर्तोनोत्तेजक सभेचे व्यास सभागृह, बाजीराव रोड, पुणे येथे रविवार २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे. 

www.punefestival.in 

टीप : पुणे फेस्टिव्हलमधील महिला महोत्सवातील स्पर्धा व बालगंधर्व रंगमंदिर येथील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पाककला स्पर्धा व कीर्तन महोत्सव यांची सविस्तर माहिती स्वतंत्र पत्रकार परिषदेद्वारे दिली जाईल. 

 


Post a Comment

Previous Post Next Post