प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वा. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योगमंत्री उदय सामंत भूषविणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच खा. रजनी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, खा. श्रीरंग बारणे, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी हे या प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील.
ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पद्मश्री खा. हेमामालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन असून पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासून सलग ३५ वर्षे पुणे फेस्टिव्हलमध्ये त्या सक्रियपणे सहभागी होत असतात. हेमामालिनी यांनी तब्बल ३० वर्षे बॅले, गणेश वंदना अथवा शिवस्तुती पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर केली आहे. यंदा देखील उद्घाटन सोहळ्यात त्या गणेश वंदना सादर करणार असून दुसऱ्या दिवशी शनिवारी ‘गंगा’ बॅले त्या सादर करतील. पुणे फेस्टिव्हलमध्ये त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल यंदा उद्घाटन सोहळ्यात त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
पुणे फेस्टीव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टीव्हलचे आयोजन केले जाते. पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात.
विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नामवंताना पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा ज्येष्ठ अस्थीरोगतज्ञ पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांना या पुरस्काराने गौरविले जाईल. तसेच संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत यांना‘पुणे फेस्टिव्हल अवार्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील मंडळांचा पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव उर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'जय गणेश' पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदा ‘खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शुक्रवार पेठ’, ‘श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट’, सोमवार पेठ, पुणे आणि सदाशिव पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (श्री शिवाजी मंदिर) यांना या पुरस्काराने गौरविले जाईल.
उद्घाटन सोहळा
दरवर्षीप्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळा देखील नेत्रदीपक असेल. ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. ढोलताशाच्या निनादात दीपप्रज्वलन व आरती होईल. हिंदुस्तानी कर्नाटकी शास्त्रीय गायिका नंदिनी गुजर गणेशस्तुती सादर करतील. पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री व नृत्यांगना हेमामालिनी सहकलावंतांसह ‘गणेश वंदना’ सादर करतील. यानंतर नितीन महाजन यांच्या केशव शंखनाद पथकाचे ४० जणांचे पथक मंचावर एकत्रित शंखवादन करतील. महाराष्ट्र मंडळाच्या विविध वयोगटातील ४० मुले - मुली ‘कलात्मक योगासने’ची प्रात्याक्षिके सादर करणार असून त्यामध्ये पूर्ण उष्ट्रासन, पूर्ण वृश्चिक आसन, पूर्ण धनुरासन, गोखील आसन आणि डिंबासन याची प्रात्यक्षिके सादर केली जातील. याचे संयोजन महाराष्ट्र मंडळ योग वर्गाच्या पल्लवी कव्हाणे यांनी केले आहे.
रामायणातील सीतेचे अपहरण, रावणाचे क्रूर वर्तन, सीतेची पतीनिष्ठ आदींवर आधारित ‘सीता’ ही नृत्यनाटिका सादर होईल. यामध्ये अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर सीतेची भूमिका बजावतील व ओम डान्स अकादमीचे विद्यार्थी साथ देतील. याचे नृत्य दिग्दर्शन ओंकार शिंदे यांनी केले आहे.
विठ्ठल विठ्ठल नामघोष व टाळमृदुंगाच्या नादात विठ्ठलाचा जयघोष करीत नाचत गात जाणाऱ्या वारकऱ्यांचा ‘विठ्ठल विठ्ठल’ हा कार्यक्रम नृत्य दिग्दर्शिका वृंदा साठे सादर करतील. याची संकल्पना आणि संयोजन करूणा पाटील यांचे आहे. ६१ कलाकारांचा यात समावेश आहे. ‘कॅलिडोस्कोप - लावणी फ्युजन' या कार्यक्रमात अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, संस्कृती बालगुडे, अमृता धोंगडे, आयली घिया, ऋतुजा जुन्नरकर, भार्गवी चिरमुले आणि रुपाली भोसले यांचा समावेश असून पायलवृंद संस्थेच्या प्रमुख ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे यांनी याचे नृत्य दिग्दर्शन व संयोजन केले आहे. ‘सुरमणी’ सानिया पाटणकर या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची गीते सादर करणार असून प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनचे सहकलावंत त्यांना साथ देतील.
अभिनेत्री व नृत्यांगना हेमामालिनी यांच्यावर चित्रित केलेल्या चित्रपटातील गाण्यांवर आधारित ‘गोल्डन इरा ऑफ ड्रीम गर्ल’ हा नृत्य कार्यक्रम सादर होईल. त्यामध्ये अभिनेत्री उर्मिला कानेटकर, नुपूर दैठणकर, श्वेता शेवाळे, मयुरेश पेम यांच्यासह नृत्य तेज अकादमीचे सहकलावंत भाग घेतील. नृत्यतेज अकादमीच्या प्रमुख नृत्य दिग्दर्शिका तेजश्री अडीगे यांनी याची संकल्पना व संयोजन केले आहे. ‘हिस्टोरिकल एम्पायर्स ऑफ इंडिया’ या कार्यक्रमात पोनियन सेलवन, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, शेर शिवराज आणि मनीकर्णिका या ऐतिहासिक चित्रपटातील गाण्यांवर अभिनेत्री नृत्यांगना शर्वरी जेमिनीस, आशय कुलकर्णी आणि कुणाल फडके हे नृत्याविष्कार सादर करतील. याची संकल्पना आणि संयोजन स्वप्नील रास्ते यांनी केले आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठीतून मंजिरी धामणकर व इंग्रजीतून दुरीया शिपचांडलर करतील.
ऑल इंडिया मुशायरा - या उद्घाटन सोहळ्यानंतर श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रात्री ८.३० वा. ऑल इंडिया मुशायरा सादर होईल. यामध्ये मंझर भूपाली (भोपाल), डॉ. लता हया (मुंबई), अंजुम बाराबंकी (लखनौ), आब्रार काशिफ (राजस्थान), सरदार सलीम (हैद्राबाद), सागर त्रिपाठी (बनारस), डॉ. कासीम इमाम (मुंबई), फरहान दिल (मालेगाव) हे देशातील नामवंत शायर सहभागी होत आहेत. शायरांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमाम कासीम (मुंबई) हे करणार असून संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इक्बाल अन्सारी (पुणे) करणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. पी ए इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी ए इनामदार आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आबेदा इनामदार करीत आहेत.
३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प आणि नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.