शिक्षक-शिक्षकेतर पदे खासगी कंत्राटदारांद्वारे भरण्याच्या निर्णयास मुख्याध्यापक संघाचा विरोध

  निर्णय मागे घेऊन प्रचलित पद्धतीने भरती प्रक्रिया सुरु करण्याची मुख्याध्यापक संघाची मागणी 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :

कोल्हापूर :   शासनाने राज्यातील शिक्षकांची भरती 'पवित्र' पोर्टलच्या माध्यमातूनच केली जाणार असल्याचे घोषित केले आहे. एकीकडे त्यासाठीची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे सरकारने बाह्य यंत्रणेकडून (कंत्राटदार) राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नऊ बाह्य सेवा पुरवठादार संस्थेच्या पॅनेलला (कंत्राटदारांना) मान्यता देण्याच्या निर्णयाने खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु आहे. शाळा अडचणीत येणार आहेत. हा निर्णय मागे घेऊन प्रचलित पद्धतीने भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन श्री. सुरेश संकपाळ होते. 

       शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने नुकताच 'जीआर' काढून नऊ बाह्य सेवा पुरवठादार संस्थेच्या पॅनेलला (कंत्राटदारांना) मान्यता देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. शिक्षकांचा कुशल मनुष्यबळ वर्गवारीत समावेश करून राज्यातील डी. एड., बी. एड. त्यासोबतच 'टीईटी' आदी पात्रताधारक शिक्षकांची पदे येत्या काळात खासगी कंत्राटदार संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. यामध्ये बी.एड., डी.एड. त्यासोबतच पदवी आणि टीईटी आदी पात्रता असलेल्या आणि तीन वर्षे अनुभव असलेल्या शिक्षकांना ३५ हजार रुपये प्रतिमाह मानधन दिले जाणार आहे तर दुसरीकडे सहायक शिक्षकासाठी प्रतिमहिना २५ हजारांचे मानधन दिले जाणार आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली.

         या बैठकीत संघाचे अधीक्षक संजय पाटील यांनी आर्थिक जमा खर्चाचा आढावा, परीक्षा आढावा घेतला. यावेळी इ.५ वी ते ९ वी वर्गाचे वार्षिक मूल्यमापनाबाबत चर्चा करण्यात आली. 

        यावेळी मुख्याध्यापक संघांचे चेअरमन व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, व्हा.चेअरमन रवींद्र मोरे, सहसचिव अजित रणदिवे, खजाननिस नंदकुमार गाडेकर, लोकल ऑडीटर इरफान अन्सारी, प्रकाश पोवार, बबन इंदुलकर, जी.के.भोसले, पी.बी.भारमल, सखाराम चौकेकर, सुरेश उगारे, श्रीकांत पाटील, सूर्यकांत चव्हाण, सेवानिवृत्त सदस्य जीवनराव साळोखे, जे.बी.पाटील, एम. के.आळवेकर, बी. आर. बुगडे, सौ.अनिता नवाळे, सौ.पुष्पा सरदेसाई, संजय देवेकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते


फोटो : विद्याभवन, कोल्हापूर येथे सभेत बोलताना मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ सोबत व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे, अजित रणदिवे, इरफान अन्सारी आदी

Post a Comment

Previous Post Next Post