महानगरपालिकेत घेतला विविध विकास कामांचा आढावा
प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी: संभाजी चौगुले :
कोल्हापूर ता.08 : जयपुरच्या धर्तीवर कोल्हापूर शहरातील हेरिटेज वास्तुंना विद्युत रोषणाई करुन शहर अधिक आकर्षक होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच शहराशी निगडीत विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास साधावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.
महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक तथा आयुक्त डॉ.के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रशासक डॉ. के.मंजूलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चांगले काम केल्याचे कौतुक करुन कोल्हापूरच्या आयुक्त म्हणूनही त्या शहरातील विविध विषय गतीने मार्गी लावतील, असा विश्वास व्यक्त केला.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्र्यांना कोल्हापूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत, असे आवाहन केले. यामध्ये शहराचा हद्दवाढ प्रश्न प्रलंबीत असून, थेटपाईपलाईनची योजना पूर्णत्वास येऊनही अमृत योजनेच्या टाक्या अपूर्ण असल्याने शहरास पाणी मिळत नसल्याचे सांगितले. याचबरोबर महापालिकेच्या कर्मचा-यांचे विविध प्रश्न प्रलंबीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची कामे लवकरात लवकर होण्यासाठी नगररचना विभागाची कार्यप्रणाली बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच शहरातील कचरा व्यवस्थापन, घंटागाड्यांची दुरुस्ती, आपला दवाखाना अंतर्गत शहरातील सर्व दवाखाने सुरु करावेत. रंकाळा तलाव म्युझिक फौंटन, जलतरण तलाव, कसबा बावडा नवीन वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे, के.एम.टी.च्या कर्मचा-यांचे विविध प्रश्न, झोपडपट्टीतील प्रश्न, अमृत योजना दुसरा टप्पा, रंकाळा परिसरातील ट्रॅफिक समस्या व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणी आदी विविध विषय गतीने मार्गी लावण्याबाबत आवाहन केले.
बैठकीच्या प्रारंभी प्रशासक डॉ.के.मंजूलक्ष्मी यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचबरोबर कोल्हापूरचे प्रलंबीत प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाधिकारी सुनिल काटे, पर्यावरण अधिकारी समीर वाघ्रांबरे, नगरसचिव सुनिल बिद्रे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.