मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून कोल्हापूर, सांगलीतील 1 लक्ष 24 हजार कृषी ग्राहकांना दिवसा वीज मिळणार

 71 उपकेंद्रे, 2148 एकर जमीन, 345 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती निविदा प्रक्रिया सुरु


प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी संभाजी चौगुले : 

कोल्हापूर परिमंडळ : कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, या हेतूने राज्य शासनाच्या वतीने महावितरण मार्फत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ‘अभियान 2025’ अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 71 उपकेंद्रांच्या ठिकाणी 2148 एकर जमिनीवर 345 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याव्दारे 1 लक्ष 24 हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीजेची सोय होणार आहे.

   शेतीला दिवसा, अखंडित व शाश्वत वीज देण्यासाठी कृषी क्षेत्राचा वीज भार असणाऱ्या वीजवाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे. 33/ 11 केव्ही उपकेंद्राच्या ठिकाणी 5 ते 10 किलोमीटर परिघातील गायरान, नापीक व पडिक जमिनीवर 0.5 ते 25 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौरप्रकल्प उभारणी करण्यात येणार आहेत. सौर प्रकल्पासाठी शासकीय जमीन नाममात्र रू.1/- या दराने भाडेपट्टा व पोटभाडेपट्ट्याने  उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प कार्यान्वित झाला असेल, त्या ग्रामपंचयातींना  रू.5 लक्ष प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत 3 वर्षासाठी देण्यात येणार आहे.

   कोल्हापूर जिल्ह्यातील 43 उपकेंद्रांच्या ठिकाणी 795 एकर जमिनीवर 159 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याव्दारे अंदाजे 65 हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे. जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील 33/11 केव्ही उपकेंद्र - कोगे (सौर प्रकल्प गावाचे नाव -बहिरेश्र्वर), बालिंगा (आडूर), गगनवाबडा तालुका: गगनबावडा (गगनबावडा), मार्गेवाडी -निवडे (म्हाळुंगे), पन्हाळा तालुका: पडळ (माजगाव), बाजारभोगाव (पिसात्रे), सातवे (सावर्डे तर्फे सातवे), वेतवडे (हारपवडे), पाटपन्हाळा (पाटपन्हाळा), कळे (परखंदळे) शाहूवाडी तालुका: शाहूवाडी (कोळगाव), सरुड (सरुड), वारुळ (वारुळ), मांजरे (मांजरे), कागल तालुका: सिध्दनेर्ली (बामणी), सोनगे (बानगे व कुरुकली), केनवडे (केनवडे), भुदरगड तालुका: पिंपळगाव (बामणे), कडगाव (तिरवडे), तांबाळे (अनफ बुद्रुक), शेलोली (शेलोली) हातकणंगले तालुका: चोकाक (हेर्ले), हातकणंगले (आळते), कुंभोज (नेज), हुपरी (रेंदाळ), किणी वाठार (किणी व वाठार तर्फे वडगाव), शिरोळ तालुका: कोथळी (कोथळी), अब्दुललाट (लाट), कोंडिग्रे (हरोली), राधानगरी तालुका: सोळांकुर (नरतवडे), चंदगड तालुका: चंदगड (काजिर्णे व चुर्णीचा वाडा), कोवाड (कोवाड), हालकर्णी (डुक्करवाडी), हालकर्णी एमआयडीसी (जंगमहट्टी), पार्ले (पार्ले), माणगाव (माणगाव), अडकूर (आमरोली व उत्साळी), गडहिंग्लज तालुका: नेसरी (सांबरे व तावरेडी), महागांव (हारळी बुद्रुक), गडहिंग्लज एमआयडीसी (शेंद्री), हेब्बाळ- क.नुल (हनिमनाळ व हासुर चंपु), आजरा तालुका: उत्तुर (मुमेवाडी व उत्तुर), गवसे (हारपवडे) उपकेंद्रे व गावांचा योजनेत समावेश आहे.              

  सांगली जिल्ह्यातील 28 उपकेंद्रांच्या ठिकाणी 1153 एकर जमिनीवर 186 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याव्दारे अंदाजे 59 हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे. जिल्ह्यातील खानापूर-विटा तालुक्यातील 33/11 केव्ही उपकेंद्र - खानापूर (सौर प्रकल्प गावाचे नाव - बेनापूर व रेणावी), लेंगरे (रेणावी), गार्डी (भाग्यनगर-भाकुचीवाडी), पारे (रेणावी), रेणावी (रेणावी), जत तालुका: संख (आसंगी), शेगाव (कोसारी), उमदी (हळ्ळी), तिकोंडी (कोंत्याव बोबलाद व तिकोंडी), पाचापुर (शेड्याळ), धावडवाडी (बेवनूर व बिरनाळ), जिरग्याळ (जिरग्याळ), बसर्गी (बसर्गी), उटगी (बेलोंडगी), तासगाव तालुका: सावळज (खुजगाव), मणेराजुरी (गवाण), वायफळे (मोरळेपेड), कौलगे (खुजगाव), मांजर्डे (गौरगाव), आटपाडी तालुका: खरसुंडी (घाणंद), लिंगीवरे (पळसखेड व लिंगीवरे), पुजारवाडी (पळसखेड), कवठेमहांकाळ तालुका: बोरगाव (मळणगाव), ढालगाव (चुडेखिंडी), करोली (कोगनोळी), केरेवाडी (केरेवाडी), कडेगाव तालुका: वांगी (तडसर), शिरसगाव (शिरसगाव) उपकेंद्रे व गावांचा योजनेत समावेश आहे.

   खुल्या निविदेमार्फत  दर आधारित बोलीव्दारे विकास कांमाबरोबर वीज खरेदी करारनामा (पीपीए) व महावितरण कंपनीसोबत  वीज विक्री करारनामा (पीएसए)  करून प्रकल्प उभारण्यात येतील. प्रकल्प जमीन व परवानग्यासाठी विशेष हेतू वाहन (एसपीव्ही)  व्यवस्था आहे. निविदा प्रक्रियेत प्रवर्तक, सहकारी संस्था, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय खाजगी विकासक, राज्य / केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम कंपनी, वैयक्तिक विकासक, शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, शेतकऱ्यांचा उत्पादक समूह इ. सहभाग घेण्यास पात्र आहेत.

 शेतीला सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो. या योजनेमुळे शेतीच्या वीजपुरवठा खर्चात कपात होईल. तसेच अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाचे उद्दिष्टही साध्य होईल. त्यामुळे क्रॉस सबसिडीचा भार कमी होऊन औद्योगिक व व्यवसायिक ग्राहकांच्या वीजदरात कपात होईल. पायाभूत विद्युत सुविधांचे बळकटीकरण, विजेच्या हानीत घट, शेतीला दिवसा व योग्य भाराने वीजपुरवठा, प्रकल्पक्षेत्रातील ग्रामपंचायतींना अनुदान प्राप्त होणार असल्याने जनसुविधांची कामे इ. फायदे योजनेमुळे होणार आहेत. कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता मा. श्री. परेश भागवत यांच्या निर्देशानुसार अधिक्षक अभियंता मा.श्री.अंकुर कावळे (कोल्हापूर), अधिक्षक अभियंता मा.श्री. धर्मराज पेठकर (सांगली) यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही जिल्ह्यातील महसूल विभागाच्या मोलाच्या सहकार्याने अतिरिकत्‍ कार्यकारी अभियंता (स्थापत्य) श्री. देवदत्त हासबे व सहाय्यक अभियंता (स्थापत्य)  विश्वजित कांबळे यांनी  परिश्रम घेतले. कोल्हापूर जिल्ह्यातील 61 उपकेंद्रे व सांगली जिल्ह्यातील 93 उपकेंद्रे योजनेसाठी प्रतिक्षेत आहेत. सदरील योजनेतून या उपकेंद्राच्या ठिकाणी सौर प्रकल्प उभारणी करण्यासाठी ग्रामपंचायतींनी व ग्रामस्थांनी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी  पुढाकार घ्यावा. जेणेकरुन त्या परिसरातील कृषी ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post