महापालिकेच्यावतीने अडीच वर्षात 11402 फेरीवाल्यांना बँकेमार्फत तब्बल 18 कोटी 28 लाख रुपये कर्ज वितरण

अद्यापही शहरातील ज्या फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनी अर्ज सादर करण्याचे महापालिकेचे आवाहन


प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले : 

कोल्हापूर ता.11 : महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत मागील अडीच वर्षात 11402 लाभार्थ्यांना बँकेमार्फत तब्बल 18 कोटी 28 लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पहिले कर्ज 10000/- सदर रक्कम नियमित परतफेड केल्यानंतर दुसरे कर्ज 20000/- मिळते सदर रक्कम नियमित परतफेड केल्यानंतर तिसरे कर्ज 50000/- दिले गेले आहे. 

कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या फेरीवाल्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SAVNidhi) योजना केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद राहिल्यामुळे उदरनिर्वाह कसे करायचे हा प्रश्न त्याच्यासमोर होता. निर्बंध शिथिल झाल्यानंतर भांडवल नसल्याने पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे आव्हान होते. अशा पथविक्रेत्यांना पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेअंतर्गत हे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

अद्यापही शहरातील ज्या फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा फेरीवाल्यांनी यामध्ये भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी, पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागीराद्वारे उत्पादित वस्तू, पुस्तके/स्टेशनरी इत्यादीचा व्यवसाय करणारे अर्ज करू शकतात. सेवा देणारे व्यवसायिक उदा. केशकर्तनालय दुकाने, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुण्याची दुकाने इत्यादी व्यवसायिक सदर योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच शहरातील स्वयंसहायता बचत गटाच्या सदस्य असलेल्या महिला व त्यांचे कुटुंब जे पी एम स्वनिधी साठी पात्र आहेत अशा सर्वांचे अर्ज करू शकतात. सदर अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क न घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. तरी संबंधीतानी महापालिकेच्या शाहूपूरी, बाळेकुंद्री मार्केट, पहिला मजला येथील शहर उपजीविका कार्यालयात फॉर्म भरावेत. अधिक माहितीसाठी फोन 0231-2991046 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच अर्जदारांनी सोबत आधार कार्ड, बँक पासबुक, फेरीवाले सर्वे पावती किंवा संबधित व्यवसायाचा पुरावा घेऊन जावे.

Post a Comment

Previous Post Next Post