प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी संभाजी चौगुले :
कोल्हापूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व जनावर मालक यांना पोलीस प्रशासनाच्यावतीने बैठक घेवून खाजगी मालकीची जनावरे शहरामध्ये उघड्यावर सोडण्यात येऊ नयेत याबाबत जाहीर नोटीसद्वारे सुचना देण्यात आलेल्या होत्या. तरी देखील शहरातील जनावर मालकांनी त्यांची जनावरे मोकाट सोडत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आरोग्य कत्तलखाना विभागामार्फत यावर प्रतिबंध करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात मोकाट फिरणारी 18 जनावरे पकडुन पांजरपोळ येथे जमा करण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य कत्तलखाना विभागामार्फत आजपर्यंत 21 जनावर मालकांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सध्या गणेशोत्सव सुरु असल्याने व येणाऱ्या दसरा व दिवाळी या सणासुदीच्या दिवसामध्ये रस्त्यावर लोंकांची वर्दळ व रहदारी जास्त प्रमाणात वाढत असल्याने मोकाट जनावरांमुळे अपघात होणे किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन आपत्ती जनक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील सर्व जनावर मालकांनी आपली खाजगी मालकीची जनावरे उघड्यावर मोकाट सोडल्यास जनावर मालकाचा शोध घेऊन संबंधीत मालकावर महापालिकेमार्फत गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच अशी जनावरे पकडण्यात येऊन कायमस्वरुपी पांजरपोळ संस्थेत जमा करण्यात येतील याची संबंधीनी नोंद घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.