महापालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळासाठी स्पर्धा



प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी: संभाजी चौगुले : 

कोल्हापूर ता.20 : राज्यामध्ये पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची स्पर्धा घेवून उत्कृष्ठ सार्वजनिक गणेश मंडळांची निवड करुन त्यांना शासनाकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शासनाने केलेल्या या उपक्रमाच्या धर्तीवरच महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मंडळांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.   

या स्पर्धेसाठी शहरातील मंडळांना सहभागी होण्याकरीता अर्जाचा नमुना www.kolhapurcorporation.gov.in या संकेत स्थळावरुन उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. हा अर्ज संबंधीत मंडळे कोल्हापूर महानगरपालिका ब्युरो विभाग (आवक विभाग) व महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालयात तसेच healthswm1@gmail.com या ई-मेल द्वारे पाठवू शकतात. यासाठी शुक्रवार दि.23 सप्टेंबर 2023 अखेर अर्ज करुन महापालिका स्तरावरील मंडळे या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

  शासन निर्णयाप्रमाणे स्पर्धेचे स्वरुप, निकष ठरविण्यात आले असून यामध्ये स्थानिक पोलिस स्टेशन आणि महानगरपालिकेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी घेता येईल. या स्पर्धे करिता गणेशोत्सव मंडळांना सहभाग हा विनाशुल्क राहील. या स्पर्धेमधून 3 स्पर्धकांची विजेते म्हणून निवड करण्यात येईल. या स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत निवड समिती गठित करण्यात आलेली असून बक्षिसांचे स्वरुप प्रथम क्रमांकास रु.15,000/- प्रशस्तीपत्र, शाल श्रीफळ व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकास रु.10,000/- प्रशस्तीपत्र, शाल श्रीफळ व ट्रॉफी व तृतीय क्रमांकास रु.5,000/- प्रशस्तीपत्र, शाल श्रीफळ व ट्रॉफी असे असणार आहे. 

या स्पर्धेच्या निकालाची तारीख व बक्षीस वितरणाचा समारंभ घेण्याची तारीख, ठिकाण स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तरी या स्पर्धेत शहरातील ज्या सार्वजनिक मंडळाना भाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपला संकेत स्थळावरुन अर्ज उपलब्ध करुन घेऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post