कर्जत तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी नाल्यात भाजी फेकली , ऐन सणात शेतकऱ्यांवर संकट



प्रेस मीडिया लाईव्ह  

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

  कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांकडून यंदा पिकवलेल्या शिराळ्याला कल्याणच्या बाजारात कवडीमोल भाव मिळाल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी शेकडो किलो भाजी थेट नाल्यात फेकल्याची घटना घडली आहे. 

   कर्जत येथील शेतकरी हा भाजीपाला पिकाकडे वळला. त्यामुळे तालुक्यात  मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते. कृषी विभागाकडून भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत केली जाते. दुसरीकडे तालुक्यात हरित पट्टा आहे. तेव्हा येथे कोणतेही कारखाने औदयोगिक क्षेत्र नाही. त्यामुळे येथील बहुतांश नागरिक नोकरदारी, मजुरी, पर्यटक आणि शेती यावर अवलंबून आहेत. तालुक्यातील खांडस परिसरात असलेल्या आदिवासी बांधवांकडून भाजीपाला लागवड करताना त्यात टोमॅटो, कारली, घोसाळी, शिराळी. वांगी, काकडी, लाल भोपळा, दुधी, भेंडी अशा भाज्या लागवड केल्या जातात. काही ठिकाणी व्यापारी हे शेतावर येऊन भाज्या खरेदी करतात मात्र त्यांचा भाव कमी असतो. त्यामुळे शेतकरी हे स्थानिक बाजारपेठ येथे किरकोळ विक्री करतात. तर मोठ्या प्रमाणातील भाज्या या कल्याण भाजी मार्केट येथे विकण्यासाठी नेतात. 

            दिनांक ९ ऑगस्ट रोजी देखील खांडस परिसरातील काही आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्याकडील शिराळी हि शेकडो किलोची भाजी कल्याण भाजी मार्केटला विकायला नेली. मात्र याठिकाणी त्यांना किलोला २ रुपये असा कवडीमोल भाव मिळाला. ४ महिने मेहनत करून, त्यासाठी पदरचे पैसे खर्च करून पिकवलेल्या भाजीला भाव मिळत नाही या प्रकाराने व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी हि भाजी तेथून परत आणत थेट राग व्यक्त करत नदीमध्ये फेकून दिली. तर अडते दलाल यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अडवणुकीचा प्रकार सातत्याने समोर येत असल्याने हे प्रकार जगाच्या पोशिंद्याच्या मुळावर घाव घालणारे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

        दरम्यान या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यावर समाजमाध्यमांवर देखील याबाबत शेतकर्यांबाबबत सहानुभूती व्यक्त होत आहे. 

कमी संवाद ठरतोय शेतकऱ्यांसाठी अडसर 

कर्जत तालुक्यात शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र सरसकट एकाच पीक जास्त येत असल्याने अनेकदा भाव पडत असतो. तेव्हा शेतकऱ्यांनी एकत्र आल्यास त्यांच्यात संवाद घडून वेगवगेळी पिके घेण्याबाबत चर्चा घडल्यास याबाबत तोडगा निघू शकत असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र यात शेतकऱ्यांमध्ये संवाद न होणे हा सगळ्यात मोठा अडसर आहे. तेव्हा यासाठी कृषी विभाग, बाजार समिती व राजकीय नेते यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.   

बाजारात शिराळी ३० ते ४० रुपये किलोने विकली जातात, किरकोळ बाजारात हा भाव असताना भाजी मार्केटमध्ये गेलेल्या आमच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या भाजीला कवडीमोल भाव भेटत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं. आमचा आदिवासी हा स्वाभिमानी आहे तो मेहनत करून पदरचे पैसे टाकून पिकवतो. आजवर कधी अशी घटना घडली नाही. पण वारंवार ग्रामीण भागातील जाणूनबुजून शेतकऱ्यांवर भाव गडगडल्याचे संकट जर कोसळणार असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं ? राज्याच्या मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी या प्रकारावर जातीने लक्ष घालून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी मी करत आहे

: जैतू पारधी, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते 

गणपती सणासाठी घरात पैसे हवेत म्हणून भाजी मार्केटला शिराळी विकायला नेली होती. पण शिराळी याना २ रुपये भाव मिळाला. शेकडो किलो भाजी नेऊन तिच्या उत्पन्नाचा खर्च देखील निघाला नाही. मार्केटला गुजरातमधून भाजी येत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या भाज्यांना भाव मिळत नाही. त्यामुळे आम्ही भाजी नदीत फेकून दिली. आता सण साजरा कसा करायचा ? मुलाबाळांना काय सांगायच अशा अनंत अडचणी समोर उभ्या आहेत. 

: भरत कडाली, शेतकरी 

कर्जत तालुक्यात स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करून शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बाजार भारावला जातो. या बाजारात अनेक व्यापारी येतात आणि माळ खरेदी करतात. तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी याठिकाणी येऊन आपला माल विकावा जेणेकरून त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. ग्रामीण भागातील  या शेतकऱ्यांनी एकत्र आल्यास मी स्वतः त्यांच्या समस्येवर उपाययोजना करेल. त्यांना शनिवारच्या बाजारात प्राधान्य मिळावे अशा सूचना करेल. 

: महेंद्र थोरवे, आमदार

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आपल्याकडे शनिवारी बाजार भरावला जातो. या बाजारात व्यापारी शेतकरी हे आपला माल विकण्यासाठी येतात. मात्र याठिकाणी व्यापारी हे खरेदीला कमी येत असल्याने स्थानिक शेतकरी हे बहुदा कल्याण येथे भाजी मार्केटला भाजी विकायला जातात. आम्ही येथे व्यापारी यावेत यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. शेतकऱ्यांवर भाजी फेकण्याची वेळ येणे हि दुर्दैवी आहे. आपला घाम गाळून शेतकरी अतोनात मेहनत करून भाजीपाला पिकवतो. मात्र त्याच्या मालाला अडते, दलाल यांच्यामुळे भाव मिळत नाही. दुसरं म्हणजे पावसाळा संपत असताना भाजीपाल्याची आवक जास्त असल्याने भाव मिळत नाही तेव्हा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वेगवगेळी पिके घेतली तर त्यांच्या पिकाला भाव मिळेल. तसेच काही दिवसात आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सगळे संचालक आदी कल्याण, बदलापूर येथील व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांना कर्जत येथे खरेदीसाठी बोलावणार आहोत ज्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय मिळेल. 

: प्रकाश फरात. सभापती, कृ.उ.बा.स.कर्जत 

Post a Comment

Previous Post Next Post