प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
कल्याण या जगामध्ये भाईगिरी करणाऱ्यांना जागेवरतीच धडा शिकवायला हवा. भारत देशाला आपण जसं स्वातंत्र्य देश मानतो. तसंच प्रत्येक व्यक्तीला आपल्यापरिने आयुष्य जग्याचं स्वातंत्र्य आहे. आपण काय करावं, कसं वागावं, कुठे जावं, काय काम करावं हे आपलं स्वातंत्र्य आहे आणि तो आपला वैयक्तिक मुद्दा आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि नैतिक असायला हव्यात. अशा नैतिक मार्गाने चालणाऱ्या नागरिकांना गावठी पिस्तूलीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या नराधमांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या पाहिजेत. अशा आरोपींच्या तर नांग्याच ठेचल्या गेल्या पाहिजेत. कल्याण पोलिसांनी तेच करुन दाखवलंय.
कमरेला देसी कट्टा लावून बुलेट गाडीवर रुबाबने फिरत कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या 24 वर्षीय गुन्हेगाराला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समीर जेठा खत्री असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक विनापरवाना बेकायदेशीर गावठी पिस्टल, 2 पितळी राउंड आणि एक बुलेट मोटारसायकल जप्त केली आहे. हा आरोपी अंमली पदार्थही विक्री करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस त्या दृष्टीने देखील तपासाला सुरुवात केलीय.
पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रात्री गस्तीवर असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघ आणि त्यांच्या पथकास महत्त्वाची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या या पथकाला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गावठी बनावटीचे पिस्टल कंबरेला लावून एक गुन्हेगार येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.
यानंतर या पथकाने अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय शिंदे डीसीपी सचिन गुंजाळ, ACP कल्याणजी घेटे, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने,गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन परिसरात सापळा रचला. पोलिसांनी उल्हासनगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 24 वर्षीय समीर जेठा खत्री नावाच्या तरुणाला ताब्यात घेत त्याच्या अंगाची झडती घेतली.
यावेळी आरोपीकडे एक विनापरवाना बेकायदेशीर गावठी पिस्टल आणि 2 पितळी राउंड मिळाले. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याक आलाय. आरोपीने गावठी कट्टा कुठून आणला आणि कशासाठी आणला याचा तपास पोलीस करत आहे. तर दुसरीकडे हा आरोपी अंमली पदार्थाची तस्करीही करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस त्याचाही तपास करत आहेत.